आई राजा उदो उदोच्या गजरात शहरातील ८७ सार्वजनिक मंडळांनी देवीची वाजतगाजत घटस्थापना केली.
गंजगोलाईचे जयजगदंबा नवरात्र मंडळ, श्री वैष्णोदेवी, आई तुळजाभवानी, श्री अंबिकामाता, िहगुलांबिकादेवी यांसह शहरातील ८७ व जिल्हय़ातील ३८७ मंडळांनी देवीची प्रतिष्ठापना केली. रेणापूर येथील रेणुकामाता मंदिरात तहसीलदारांनी पूजा केली. औसा तालुक्यातील देवताळा व खरोसा येथील मंदिरात पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली. काही गावांत हातावर घट बसवून ९ दिवस देवीची आराधना करणारे भाविकही आहेत. गेल्या ७-८ वर्षांपासून अशा पद्धतीने देवीची आराधना करण्याची पद्धत रुढ होत आहे. भाविकांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत असून ९ दिवस उपवास, पादत्राणे न वापरणे या पद्धतीने भक्तिभाव प्रकट केला जातो. ९ दिवस बहुतांश ठिकाणी भजन, कीर्तनावर भर दिला जातो. उत्सवकाळात अनुचित प्रकार घडू नये या साठी पोलिसांनी जय्यत तयारी केली असून जिल्हय़ात १ हजार अधिकारी, कर्मचारी तैनात केले आहेत. राज्य राखीव दलाची तुकडी, ८०० होमगार्डस् या कामावर नियुक्त आहेत. उत्सवकाळात संशयास्पद हालचाली आढळून आल्यास पोलिसांशी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक बी. जी. गायकर यांनी केले.