रस्त्यावर कचरा फेकताय, मोठय़ा प्रमाणात ध्वनिप्रदूषण करताय, पर्यटनस्थळांची नासधूस करताय, कागदाचा कचरा करताय, झाडांचा नाश करताय..थांबा ‘ग्रिनी दि ग्रेट’ येतोय. पाण्यामध्ये प्लास्टिक टाकताय, फास्टफूड खाताय, पर्यावरणाची हानी करताय.. थांबा ‘ग्रिनी दि ग्रेट’ येतोय. हा ‘ग्रिनी’ आहे तरी कोण, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पर्यावरणाचा नाश करणारी कृती करणाऱ्यांना त्यांच्या परिणांमाची जाणीव करून देण्यासाठी ठाणे महापालिकेने तयार केलेले कार्टून कॅरेक्टर म्हणजेच ‘ग्रिनी द ग्रेट’. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विविध उपक्रमांमध्ये पर्यटनासाठी पोषक वातावरण आणि स्वच्छतेचा संदेश देणारा हा ‘ग्रिनी’ लवकरच ठाणे महापालिकेच्या पर्यावरण संवर्धनाच्या मोहिमेतदेखील सक्रिय होणार आहे. पुण्यातील चित्रकार असलेल्या सुनील बोडले यांनी ‘ग्रिनी द ग्रेट’ या कार्टून कॅरेक्टरला जन्म दिला. माणुसकी माणसाच्या समस्यांपलीकडे जाऊन वनस्पती, प्राणी, पक्षीदेखील सजीव असून आजच्या शहरीकरणाचा त्रास त्यांनादेखील होत असून त्यांच्या मनात नेमक्या काय कल्पना असतील हे दाखवण्यासाठी त्यांनी ग्रिनीची निर्मिती केली. एक गवताचे रोपटे असलेला ग्रिनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देऊ लागला. सुरुवातीला केवळ कार्टून पात्र असलेल्या ग्रिनीचे चित्र फेसबुक या सोशल साइटवर लोकप्रिय ठरले आणि २०११ मध्ये पर्यटन विकास महामंडळाने त्यास आपल्या प्रचारासाठी फिल्मचे नवे रूप दिले. पुढे पर्यटन विकास महामंडळ, पुणे वनविभाग, विविध सामाजिक संस्थांनी या शॉर्ट फिल्मच्या सादरीकरणातून त्यास लोकप्रिय केले. मुंबई सीएसटी स्टेशनवरील टीव्ही स्क्रीन्स, फूड मॉल आणि काही चित्रपटगृहांमध्येदेखील हा ग्रिनी झळकला. आयुक्त आसिम गुप्ता यांना ग्रिनी संकल्पनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ठाण्यातील पर्यावरण संवर्धनासाठी ‘ग्रिनी’ वापरण्यासाठी सुनील बोडले यांच्याशी चर्चा केली. ग्रिनीच्या टीमने केवळ १ रुपयामध्ये ग्रिनी हे पात्र वापरण्याची परवानगी महापालिकेला दिली असून महापालिकेच्या वतीने तसा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर ठेवला आहे. सर्वसाधारण सभेत यास मान्यता मिळाल्यानंतर ग्रिनी ठाणे महापालिकेचादेखील पर्यावरण संरक्षक बनणार आहे.
ठाणेकरांशी ‘ग्रिनी’ची भेट..
शॉर्ट फिल्म्स, संगणक गेम्स, पोस्टर, जाहिराती, वृत्तवाहिन्या, जाहिरात पत्रके, यांसारख्या साहित्यातून ‘ग्रिनी’ हे कार्टूनपात्र ठाणेकरांच्या भेटीस येणार आहे. सोसायटी, निवासी संकुलांमध्ये जाऊन पाणी वाचवा, सुका कचरा ओला कचरा वेगळा करा, पावसाचे पाणी साठवा असे संदेश देताना या ग्रिनीचा उपयोग केला जाणार आहे. महापालिकेच्या कार्यक्रमांमध्येदेखील ग्रिनी हे पात्र झळकणार असून त्यातून तो पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणार आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली.
जन्माची काल्पनिक कथा..
एका ओसाड माळरानावर एका जीर्ण वृक्षाच्या सावलीत एक रोपटे उगवते. जीर्ण वृक्ष पडणार असल्याने तो या छोटय़ा रोपटय़ाला या भागातून जाण्याची विनंती करते. सध्याच्या काळात जगायचे असेल तर स्थलांतराशिवाय पर्याय नाही असे बोल मोठे वृक्ष लहान रोपटय़ाला सांगते. त्यामुळे हे छोटे रोपटे आपली मुळे बाहेर घेऊन या जगामध्ये फिरू लागते. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, त्यांच्या रक्षणाचे प्रयत्न हे रोपटे सुरू करते. हे रोपटे म्हणजेच ‘ग्रिनी द ग्रेट’ अशी ग्रिनीच्या जन्माची कथा ग्रिनी द ग्रेट या वेबसाइटवर पाहायला मिळते.