विद्यार्थ्यांना नॉन क्रिमीलियर प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
शैक्षणिक सत्राची सुरुवात झाली असून प्रवेशापासून तर शिष्यवृत्तीचे अर्ज करण्यापर्यंतचा कालावधी संपत आलेला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्राकरिता कार्यालयात योग्य कागदपत्रांची पूर्तता केलेली असून कार्यालयातर्फे प्रमाणपत्र देण्याची मुदत संपली असतानाही विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आलेले नसून विद्यार्थी व पालकांना मानसिक व आर्थिक त्रास होत आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता नॉन क्रिमीलियर सक्तीचे करण्यात आले असून याकरिता नियमानुसार विद्यार्थ्यांनी कार्यालयात अर्ज सादर केलेले आहे. परंतु, कार्यालयाचा ढिसाळ कार्यप्रणालीमुळे प्रमाणपत्र दिलेल्या वेळेत उपलब्ध करून देण्यात आले नाही. यामुळे विद्यार्थ्यांना पाहिजे त्या महाविद्यालयात प्रवेश मिळत नसून शैक्षणिक नुकसान होत आहे. नॉन क्रिमीलियर प्रमाणपत्राची वैधता एक वर्षांची असते. परंतु, ३ वर्षांपर्यंत दरवर्षी वैध करण्याकरिता कागदपत्राची पूर्तता करून पुन:नोंदणीची उपाययोजना सुद्धा प्रशासनामार्फत करण्यात यावी, जेणेकरून वेळ व पैसा तसेच विद्यार्थी व पालकांना होणारा शारीरिक व मानसिक त्रास सुद्धा होणार नाही. यंदाचे नॉन क्रिमीलियर प्रमाणपत्र, तसेच शिष्यवृत्तीशी संबंधित प्रमाणपत्र कार्यालयामार्फत तात्काळ देण्याचे संबंधितांना निर्देश द्यावे अथवा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी दिला आहे.