18 September 2020

News Flash

‘सत्य साईबाबांचे स्तोम हाही भ्रष्टाचारच’!

कर्मकांडातून समाजात अंधार निर्माण करणाऱ्यांना स्पष्ट विरोध करतानाच सत्य साईबाबांचे स्तोम न पटणारेच आहे. किंबहुना तो एक भ्रष्टाचारच आहे, असे ज्येष्ठ पत्रकार सुधाकर डोईफोडे यांनी

| October 1, 2013 01:54 am

कर्मकांडातून समाजात अंधार निर्माण करणाऱ्यांना स्पष्ट विरोध करतानाच सत्य साईबाबांचे स्तोम न पटणारेच आहे. किंबहुना तो एक भ्रष्टाचारच आहे, असे ज्येष्ठ पत्रकार सुधाकर डोईफोडे यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या साक्षीने ठणकावून सांगितले. निमित्त होते डोईफोडे यांच्या प्रकट मुलाखतीचे. पत्रकारिता व नांदेडच्या सार्वजनिक जीवनात गेली ५ दशके कृतिशील असलेल्या डोईफोडे यांना स्वाराती मराठवाडा विद्यापीठाने जीवन साधना गौरव पुरस्काराने सन्मानित केले. या निमित्ताने स्वयंवर प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या कार्यक्रमात साहित्यिक देवीदास फुलारी व कलासक्त राजकारणी सुनील नेरलकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. या वेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण श्रोते म्हणून, तसेच शांताई पुरस्कार वितरित करण्यासाठी पाहुणे या नात्याने उपस्थित होते. गायक व संगीत समीक्षक रत्नाकर अपस्तंभ यांना हा पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी वीज गायब झाल्याने चव्हाण यांना भाषण करता आले नाही.
मुलाखतीदरम्यान डोईफोडे यांनी अंधश्रद्धा, समाजातील अनिष्ट प्रथा यावर जोरदार फटकेबाजी केली. चमत्कार दाखविणारे अनेक बाबा आहेत. भक्तांना लुबाडणारी ही माणसे ज्ञानशून्य आहेत. कर्मकांडातून समाजात अंधार निर्माण करणाऱ्यांना मी नेहमीच विरोध केला. सत्यसाईंबद्दल (चव्हाण यांची क्षमा मागून!) डोईफोडेंनी शाब्दिक घणच घातला. राष्ट्रपती, पंतप्रधानपदांवरील नेतेमंडळी सत्य साईबाबांकडे जात, तेव्हा ही मंडळी त्यांच्यापेक्षा कमी उंचीवर असलेल्या स्थानावर बसत असत. त्यांच्याकडे चमत्कार वगैरे काही नव्हता, तर ती निव्वळ हातचलाखी होती, असे डोईफोडेंनी सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. अंधश्रद्धा व भोंदुगिरीवर घणाघात सुरू होताच फुलारी यांनी चतुराईने त्यांना दुसऱ्या प्रश्नाकडे नेले. डोईफोडे म्हणाले की, वाचनातून समाजवादी विचारांचा प्रभाव पडत गेला. त्यामुळे समाजवाद स्वीकारला. पत्रकार या नात्याने अनेक मोठय़ा व्यक्तींवर टीका केली, पण या नेत्यांचे मोठेपण विसरलो नाही.
गोविंदभाई श्रॉफ, कुरुंदकर, शंकरराव चव्हाण यांच्यावर टीका केली. त्यांच्याबद्दल मनात द्वेष नव्हता. राज्यात अनेक मंत्री-मुख्यमंत्री होऊन गेले, पण शंकरराव खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री होते. त्यांनी महाराष्ट्राला दिशा दिली, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. मी समाजवादी असलो तरी संतांच्या विचारांना मानतो. काय करावे व काय करू नये हे महाराष्ट्राला संतांनीच सांगितले. त्यांच्यावरच आपली संस्कृती टिकून असल्याचे डोईफोडे यांनी नमूद केले. मुलाखतीच्या आरंभी त्यांनी पत्रकारितेतील आगमनाबद्दल विस्ताराने सांगितले. सावकारी हा आमचा परंपरागत व्यवसाय. तो व पुढे वकिली सोडून वृत्तपत्र क्षेत्र निवडले. वृत्तपत्र हे लोकशिक्षणाचे हत्यार आहे, अशी आपली धारणा होती, त्यामुळेच हे क्षेत्र ठरवून निवडले. या वाटचालीत आपण स्वत:हून कोणाच्या वाटेला गेलो नाही. मात्र, एखाद्याने चिमटा घेतला तेव्हा त्याला लाथ मारली असेल, हे नक्की! असे सांगताच श्रोत्यांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2013 1:54 am

Web Title: glorifying satya saibaba is also corruption doiphode
टॅग Corruption
Next Stories
1 सांघिक कामातून लातूरचा लौकिक वाढवा- देशमुख वार्ताहर
2 महिलेसह चौघे लाचखोर तीन सापळ्यांत अडकले
3 विचार विकास मंडळाचा वाद चिघळला
Just Now!
X