पुणे येथील सहकार क्षेत्रासाठी प्रसिध्द होणाऱ्या सहकार सुगंध या मासिकातर्फे दरवर्षी सहकारी संस्थेच्या अहवालांची राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येते. दूध संस्था गट, साखर कारखाना गट अशा वेगवेगळ्या गटांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी सहकारातील दूध संस्था गटातून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी दूध संघ (गोकुळ) च्या अहवालास प्रथम क्रमांक मिळालेला आहे. तर व्दितीय व तृतीय अनुक्रमे औरंगाबाद जिल्हा दूध संघाला व इस्लामपूर येथील राजारामबापू दूध संघाला मिळालेला आहे, अशी माहिती सहकार सुगंध या मासिकाचे संपादक भालचंद्र कुलकर्णी यांनी पुणे येथे दिली. या अहवालाचे मूल्यमापन करताना अहवालाची मांडणी, संस्थेच्या कामकाजामध्ये गुणवत्ता वाढ तसेच संबंधीत संस्थेने आपल्या सभासदांना करून दिलेला जास्तीत जास्त लाभ या बाबींचे मूल्यमापन करण्यात येते. पुरस्कार वितरण समारंभ पुणे येथे एस.एम.जोशी सभागृहामध्ये उद्या ३१ जानेवारी रोजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते व सहकार आयुक्त मधुकरराव चौधरी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.