नागपूर येथे संत तुकडोजीमहाराज विद्यापीठाच्या वतीने भरविण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडामहोत्सवात सोलापूर विद्यापीठाच्या मुलांच्या संघाने हॅन्डबॉल स्पर्धेत अजिंक्यपदासह सुवर्णपदक मिळविले. तर मैदानी स्पर्धेत प्रथमेश देशपांडे याने लांब उडीमध्ये कांस्य आणि अमरजा होटे हिने तिहेरी उडीत कांस्यपदकाची कमाई केली.
या क्रीडा स्पर्धेत सोलापूर विद्यापीठाच्या हॅन्डबॉल पुरुष संघाने मराठवाडा कृषी विद्यापीठासह मुंबई विद्यापीठ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास नमवून अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यात यजमान नागपूरच्या संत तुकडोजीमहाराज विद्यापीठ संघावर ९ गोलच्या फरकाने मात करून सोलापूर विद्यापीठ संघाने सुवर्णपदक खेचून आणले. या क्रीडामहोत्सवात सवरेत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार सोलापूर विद्यापीठ हॅन्डबॉल संघाचा कर्णधार रामेश्वर परचंडे यास मिळाला. या यशाबद्दल सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार व कुलसचिव कॅ. डॉ. नितीन सोनजे तसेच विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी डॉ. डी. डी. पुजारी, विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक प्राचार्य डॉ. बी. एम. भांजे, परीक्षा नियंत्रक डॉ. डी. जे. साळुंखे यांनी हॅन्डबॉल संघाचे व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले. संघाचे मार्गदर्शक प्रा. अशोक पाटील, प्रा. आनंद चव्हाण, प्रा. बाळासाहेब वाघचवरे, प्रा. समर्थ मनुकर यांचेही अभिनंदन करण्यात आले.