महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांनी येथे बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचा नामोल्लेख टाळून त्यांच्यावर जोरदार टीका केली. कोणतेही विकासकाम केले नाही, करणार नाहीत, मात्र केवळ गप्पा मारायच्या व अधिकारात असो नसो पोकळ घोषणा करायच्या, प्रसंगी उदघाटन करणारे राष्ट्रीय नेतेही आमच्याकडे आहेत असे ते म्हणाले.  
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे यांनी कर्जत व खेड येथे रक्तदान शिबिर व मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. या कार्यक्रमात धस बोलत होते. माजी आमदार राजीव राजळे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र फाळके, सभापती सोनाली बोराटे आदी या वेळी उपस्थित होते.
धस म्हणाले, नगरच्या जिल्हा बँकेचा कारभार चांगला आहे. आमच्या बीड जिल्हा बँकेचे निम्मे संचालक मंडळ गैरव्यवहारांमुळे तुरुंगात आहे. उर्वरित संचालकही कोणत्याही क्षणी तुरुंगात शकतात. भाजपच्या काही नेते शरद पवार व अजित पवार यांची बदनामी करण्यातच धन्यता मानतात. यांचे नेते इकडे शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे असे म्हणतात व शहरात गेले की, कांदा व साखर महाग झाली असे म्हणतात. सिंचनप्रकरणी अजित पवार यांच्यावर केल्या जाणा-या आरोपांमध्येही तथ्य नसल्याचे धस यांनी सांगितले.
फाळके म्हणाले, कर्जत येथे पिण्यास पाणी नाही, गावात रस्ते नाहीत, सर्वत्र घाणीचे साम्राज्य असताना केवळ रस्त्यात खांब उभे करून सुशोभीकरण होणार नाही. मात्र लोकप्रतिनिधीच निष्क्रिय आहे. कर्जतसाठी ३२ कोटी रुपयांच्या पाणीयोजनेस मान्यता देण्यासाठी अजित पवार यांनी पुढाकार घेतल्याची माहिती फाळके यांनी दिली.
धांडे यांनी तालुक्यातील विविध प्रश्न मांडले. या वेळी बाळासाहेब शिंदे व संदीप गागंर्डे यांचीही भाषणे झाली.