एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आणि वचन संस्था यांच्यावतीने चिंचओहोळ येथे कुपोषण निर्मूलनासाठी सुरू असलेल्या ‘उष्टावन्न’ संस्कार उपक्रमांतर्गत गृहभेटी, बैठका, प्रात्यक्षिके यावर भर देण्यात आला आहे. या कालावधीत कुपोषण निर्मूलनासाठी बालकांच्या मूलभूत गरजा आणि कौटुंबिक स्वास्थ्यावर अधिक भर देणे गरजेचे आहे हे वारंवार अधोरेखित झाले. जिल्हा परिषद तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उपलब्ध निधीतून काही सोयी-सुविधा उपलब्ध करून देता येतील का, या दृष्टीने चाचपणी सुरू असली तरी सरकारदरबारी असणारी अनास्था चिंतेचा विषय ठरत आहे.
उष्टावन्न संस्कार उपक्रमाची अंमलबजावणी करताना झालेल्या गृहभेटीत काही बालके कुपोषित असली तरी ८० टक्केबालके ‘सॅम’, ‘मॅम’ वर्गात मोडतात. या शिवाय त्यांच्यात रक्ताक्षयाचा विकारही आढळला. यावर उपाय म्हणून त्यांची हिमोग्लोबिन तपासणी करीत रक्त वाढविणाऱ्या अन्नघटकांवर भर देत विविध आहार कृती तयार करण्यात आल्या. मात्र त्या कशा तयार कराव्यात,बाळाला खाऊ घालताना स्वच्छतेची काळजी कशी घ्यायची याची माहिती पुस्तिकेच्या माध्यमातून देण्यात आली. त्यात एखादा पदार्थ शरीर वाढीसाठी किती प्रथिने, पौष्टिकता पुरवतो याचीही सखोल माहिती देण्यात आली. या भागात उपलब्ध असणाऱ्या अन्नपदार्थाचा विचार करता तांदळाच्या व उडदाच्या पिठाची पेज, नागलीच्या पिठाची पेज, गव्हाच्या पिठाची उकडपेंडी, उडदाची डाळ घालून रव्याचा उपमा, डाळ-तांदळाची खिचडी, शेंगदाण्याचा लाडू आदी पदार्थावर भर देण्यात आला. प्रशिक्षण सुरू असताना काही गोष्टी समोर आल्या, त्यावर विचार होणे आवश्यक आहे. रोजच्या जेवणात हिंगाचा वापर अजिबात होत नाही. येथील स्त्रियांचा अर्धा वेळ हा चुलीवरच्या स्वयंपाकात जातो. या भागात बायोगॅस अजून पोहोचलेला नाही. ज्यांच्यापर्यंत घरगुती स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर आले, त्यांनी सिलेंडर संपल्यानंतर गॅस ठेवून दिला. कारण सिलेंडर वितरण करणारी एजन्सी त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही. स्वयंपाकघरात तसेच अंगणवाडीमध्ये कुकर व गॅसचा वापर होत नाही. अंगणवाडय़ांमध्ये वजनकाटय़ामध्ये फरक तर काही ठिकाणी वजनकाटे बंद अवस्थेत आहेत.
या पाश्र्वभूमीवर, मानव विकास किंवा नवसंजीवनीच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या निधीचा विनियोग अंगणवाडय़ांमध्ये कुकर व बायोगॅस, गॅस उपलब्ध करून देण्यासाठी होऊ शकतो का, याचा विचार होणे गरजेचे आहे. केवळ नागली, तांदूळ, गहू याशिवाय रेशनकार्डवर तुरडाळ, मुगडाळ बाळाच्या आहारासाठी उपलब्ध करून दिली गेली पाहिजे. तसेच, अंगणवाडय़ांतील अनेक वजनकाटे बंद झाले आहेत. त्यामुळे सर्व प्रकल्पांत अंगणवाडय़ांमध्ये तसेच आशांकडे एकाच प्रकारचे वजनकाटे दिले गेले पाहिजेत. जेणेकरून बाळाची महिन्याला होणारी वाढ, वजन लक्षात येईल.

मूलभूत गरजांचा विचार नाही
राज्य सरकार मानव विकास, नवसंजीवनी अशा विविध योजनांच्या माध्यमातून आदिवासी आर्थिकदृष्टय़ा सक्षम व्हावा यासाठी प्रयत्नशील असली तरी त्यांच्या मूलभूत गरजांचा विचार होताना दिसत नाही. आजच्या घडीला स्वयंपाकासाठी आवश्यक असणारा गॅस, कुकर ही त्यांच्या लेखी स्वप्नवत गोष्ट असली तरी बायोगॅस किंवा अन्य काही उपकरणे निधीच्या माध्यमातून अंगणवाडय़ांमध्ये उपलब्ध करून देता येईल का, रेशिनगच्या दुकानात गहू, नागलीच्या पुढील काही पर्याय त्यांच्यापर्यंत पोहोचतील या अनुषंगाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. कुपोषित व अतिकुपोषित श्रेणीतील बालकांचाही विचार होत नाही. त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष अथवा नियमित औषधोपचार याकडे दुर्लक्ष केले गेल्याचे दिसते.

‘निधीच्या उपलब्धतेवर विचार’
वचन संस्थेकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर काय करता येईल, या दृष्टीने विचार सुरू होईल. अमरावतीच्या धर्तीवर नाशिकमध्ये काही उपक्रम राबविता येईल का, यासाठी निधी कसा उपलब्ध होईल यावर काम सुरू आहे.
उध्दव खंदारे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग)