शासकीय महाविद्यालयात गुरुवारी आयोजित कार्यक्रमात राज्य सरकार गतिमान झाल्याच्या चच्रेने चांगलीच रंगत आणली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण लवकर निर्णय घेत नाहीत, असा आरोप राष्ट्रवादीकडून अलीकडे नेहमीच केला जात आहे. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार-मंत्र्यांनी गेल्या महिनाभरात सरकार गतिमान झाल्याचे मान्य केले! निमित्त होते शहरातील शासकीय महाविद्यालय परिसरातील मूत्रविकार व मूत्रिपड प्रत्यारोपण विभागाच्या इमारतीच्या उद्घाटनाचे.
कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मंजुरीच्या पातळीवर असलेला प्रस्ताव, शुद्ध पाण्याची कमतरता असताना मोठय़ा थाटामाटात हा उद्घाटन सोहळा पार पडला. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, आमदार सतीश चव्हाण, एम. एम. शेख व कल्याण काळे यांची या वेळी उपस्थिती होती. शहरातील घाटी रुग्णालयास जिल्हा नियोजन समितीतून दिलेला निधी खर्च होत नसल्याचे सांगत आमदार चव्हाण यांनी गेल्या महिनाभरात सरकार गतिमान झाल्याचा विषय छेडला. आता काही निर्णय तातडीने व्हावे लागतील. अनेक ठिकाणी मशीन आहेत, पण त्याला तंत्रज्ञच नाहीत, यासह या विभागाचे अनेक प्रश्न रेंगाळले आहेत. मंत्रिमंडळात शालेय शिक्षणमंत्री साथ देतील. औरंगाबादचे प्रश्न धसास लावा, असे आवाहन त्यांनी केले.
हा धागा पकडत वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावीत यांनी, काही निर्णय घेण्याची इच्छा गेली अडीच वष्रे होती. त्यातील ५० टक्के निर्णय गेल्या महिन्यात झाले. त्याची माहिती उपस्थितांना दिली. प्रत्येक विभागात सुपर स्पेशॉलिटी इन्स्टिटय़ूटही उभारली जाणार आहे. या बरोबरच निवासी डॉक्टरांना देण्यात येणाऱ्या वेतनश्रेणीतही मोठी वाढ होणार आहे. केवळ दीड हजार रुपये मानधन दिले जाते, अशी माहिती मंत्रिमंडळासमोर ठेवली गेली, तेव्हा मुख्यमंत्र्यासही सर्वानी हसून प्रतिसाद दिल्याचे सांगून यात वाढ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या क्षेत्रातील व्यक्तींना अधिक वेतन का द्यायचे, हे मंत्रिमंडळातील सदस्यांना पटवून द्यावे लागते. त्यासाठी बरीच कसरत करत असल्याचे सांगत गावित यांनी, ‘मी मंत्री आहे. म्हणजे बरे आहे, असे समजू नका. या खुर्चीत बसल्यावरच समजते किती चटके बसतात ते,’ असे म्हटले. मात्र, गेल्या महिन्याभरात प्रशासन गतिमान झाल्याने बरेच निर्णय झाल्याचे सांगत त्यांनी आमदार चव्हाण यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. मंत्री दर्डा यांनीही सरकार गतिमान असल्याच्या उल्लेखाला आवर्जून समर्थन दिले. कार्यक्रमात नेत्यांनी एकमेकांची स्तुती केली आणि सरकारच्या गतिमानतेवर चर्चा केली.