तानपुऱ्यांचा मधुर आवाज, नटराज व शारदा देवीची पूजा, रसिकांची विशेष उपस्थिती आणि नाटय़क्षेत्रातील कलोपासक विद्यार्थी-विद्यार्थिनींचे मंत्रमुग्ध करणारे सुरेल गायन, अशा अपूर्व वातावरणात नाटय़संगीताचा कार्यक्रम येथे संपन्न झाला. अ‍ॅड. एम.बी. देशमुख अध्यक्षस्थानी होते, तर उद्योगपती चंद्रशेखर मोर प्रमुख अतिथी होते.
‘अंगणी पारिजात फुलला’ आणि ‘अरे वेडय़ा मना तळमळशी’ ही लोकप्रिय नाटय़गीते सई आणि राई गुल्हाने या बालकलाकारांनी सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. ‘वद जाऊन कुणाला शरण गं’ हे शैलजा देशपांडे यांनी म्हटलेले आणि ‘तारीनी नव वमनधारिनी’ हे नंदकिशोर तिवारी यांनी, तर ‘राधा धर मधुमिलिंद जय जय’ हे जयंत कारिया यांनी सादर केलेले नाटय़गीत रसिकांसाठी पर्वणी ठरले.
देवराव भालेराव या शास्त्रीय गायनाच्या उपासकांनी राग नंद सादर केला. वर्षां इंगोले यांनी ‘येतील कधी येदुवीर सखेये’ हे संगीत सुवर्णतुला नाटकातील आणि एकला नयनाला विषय तो झाला हे स्वयंवर नाटकातील गीत सादर करून आपल्या मधुर आवाजाने श्रोत्यांची दाद मिळविली. उदयोन्मुख बाल कलाकार कुणाल धोंगडे (तबला), मोहन तराळे (तानपुरा) आणि ज्येष्ठ वयोवृद्ध संगीतकार प्रा. पुरुषोत्तम कासलीकर (हार्मोनिअम) यांच्या गायन-वाद्यांच्या साथीने कार्यक्रमात रंगत आणली.
 प्रा. पुरुषोत्तम कासलीकर यांनी ‘विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी’ आणि ‘बहु तेरा समझाये लखन वा’ ही ठुमरी सादर करून रसिकांना तृप्त केले. याप्रसंगी गुणवंत ठाकरे, प्रा. विनायक भिसे, नानासाहेब देशपांडे, मोहन इंगोले, उषा मोर इत्यादी रसिकांनीही कला सादर केली. अ‍ॅड. एम.बी. देशमुख आणि चंद्रशेखर मोर यांनी भाषणातून संगीताचे जीवनातील स्थान या विषयावर प्रकाश टाकला. पुणेच्या भारत गायन समाज संस्थेतर्फे नाटय़संगीताच्या ज्या परीक्षा घेतल्या जातात त्यात सभा गायन हाही एक भाग असतो. त्या निमित्ताने या संगीत सभेचा कार्यक्रत आयोजित करण्यात आला होता.