रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा, रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना फेरीवाल्यांचा पडलेला विळखा, नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या स्कॉयवॉकचा आधार घेत उभ्या राहिलेल्या बेकायदा टपऱ्या, जागा मिळेल तेथे सर्व नियम धाब्यावर बसवून उभी करण्यात आलेली वाहने आणि या सगळ्या बेशिस्तीकडे उघडय़ा डोळ्यांनी पाहणारे वाहतूक पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी. शहराचा विकास, नियोजन अशा आघाडय़ांवर पूर्णपणे अपयशी ठरलेल्या कल्याण रेल्वे स्थानक परिसर गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक कोंडीचे जंक्शन बनले असून अवघ्या मिनिटभराच्या मार्गावरून वाट काढताना प्रवाशांना ३५ ते ४० मिनिटे प्रतीक्षा करावी लागत असल्यामुळे शासकीय यंत्रणांच्या नावाने कल्याणकर अक्षरश: खडे फोडताना दिसू लागले आहेत.
कल्याण शहराच्या वाहतूक व्यवस्थेच्या सुधारणेसाठी आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारचे भरीव काम झाले नसल्याने शहरात वर्षांचे बाराही महिने वाहतूक कोंडीचा माहोल दिसू लागला आहे. कल्याण स्थानक परिसरातील वाहतुकीचे नियोजन व्हावे आणि गर्दीच्या रस्त्यावरून पादचाऱ्यांना मार्ग काढता यावा यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून स्कायवॉकची निर्मिती करण्यात आली आहे. या स्कॉयवॉकमुळे कल्याण स्थानकासमोरील  अरुंद रस्ता रुंद झाला आणि वाहनांसाठी मोकळा आणि मोठी जागा उपलब्ध झाली. यामुळे कल्याण स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीचे चित्र पालटेल आणि प्रवास सुखकर होईल, अशी भाबडी आशा कल्याणकरांच्या मनात होती. मात्र, कल्याण-डोंबिवली महापालिकेतील मुजोर अधिकारी आणि कसलेही देणेघेणे नसल्याच्या आविर्भावात वावरणारे वाहतूक पोलीस यामुळे पूर्वीचे चित्र बरे होते, असे म्हणण्याची वेळ कल्याणकरांवर ओढवली आहे.
रिक्षांचे कोंडाळे आणि फेरीवाल्यांचा उपद्रव स्कॉयवॉकला लागूनच एखादे रिक्षा स्थानक उभे केले जावे, अशी मागणी या भागात वर्षांनुवर्षे केली जात आहे. तसा प्रयत्नही वाहतूक पोलिसांनी करून पाहिला. मात्र, वाहतूक पोलिसांची कोणतीही जरब नसल्याने या भागात जागोजागी रिक्षांचे कोंडाळे उभे राहू लागले आहे. मुरबाडरोड, आग्रारोड, संतोषी माता रोड या मुख्य रस्त्यांबरोबर रेल्वे स्थानकाच्या दिशेने येणारे सर्व रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. रिक्षा थांब्यावर काही मोजके अपवाद वगळले तर बरेचसे रिक्षाचालक हे रस्त्याच्या मधोमध बेशिस्तपणे रिक्षा उभ्या करतात. पादचाऱ्यांना त्यामुळे त्रास होतो. बेशिस्त वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्टेशन परिसरात सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला. एमसीएचआय संघटनेच्या मदतीने परिसरात कॅमेरे बसवण्यात आले. मात्र वाहतूक पोलीस त्याचा उपयोगच करत नसल्याने हे कॅमेरे केवळ शोभेचे बनले आहेत. महापालिकेच्या डोळ्यादेखत या भागात बेकायदा फेरीवाल्यांनी बस्तान बसविल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली आहे. स्कॉयवॉकलगत मोकळ्या जागेवर वाहनतळाची व्यवस्था करणे शक्य आहे. मात्र, त्याखाली बेकायदा टपऱ्या उभ्या राहिल्या आहेत. अतिक्रमण विभाग त्याकडे दुर्लक्ष करत आहे.