कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत येणाऱ्या माडा, टिटवाळा, मोहने, बल्याणी भागात मोठय़ा प्रमाणावर उभ्या राहिलेल्या बेकायदा बांधकामावर हातोडा फिरवा, असे स्पष्ट आदेश आयुक्त शंकर भिसे यांनी देऊनही गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाकडून केवळ कारवाईचा देखावा उभा केला जात आहे. ज्या प्रभाग अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत बेकायदा बांधकामांचे इमले उभे राहिले, त्यांनाच कारवाई करण्याचे आदेश दिले गेल्याने चोरांच्या हातात तिजोरीच्या चाव्या, अशी एकंदर परिस्थिती आहे. त्यामुळे मुख्यालयात बसून आयुक्तांनी कारवाईचे आदेश द्यायचे आणि संबंधित अधिकाऱ्यांनी नावापुरती कारवाई करून काढता पाय घ्यायचा, असे एकंदर चित्र आहे.
या सगळ्या परिसरात मोठय़ा प्रमाणावर उभ्या राहिलेल्या बेकायदा बांधकामांविरोधात कारवाई सुरू करा, असे आदेश आयुक्तांनी नुकतेच दिले. त्यानुसार कारवाई सुरू झाली खरी, मात्र बांधकामे तोडताना ठरावीक भाषिकांच्या बांधकामांवर हातोडा फिरवून मूळ माफियांना संरक्षण दिले जात असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. या भागाचे प्रभाग अधिकारी रवींद्र गायकवाड, सुखदेव दापोडकर, पठाण यांच्या कार्यकाळात ही बांधकामे उभी राहिली आहेत आणि त्यांच्यावरच ही बांधकामे तोडण्याची जबाबदारी टाकण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मांडा, टिटवाळा भागात ‘साई-मन्या’ नावाच्या व्यक्ती अनधिकृत बांधकामांमधील मध्यस्थ आहेत. ही सगळी बांधकामे आयुक्त भिसे यांच्या कार्यकाळापूर्वीची आहेत. काही बांधकामे भिसे आल्यानंतरही उभी राहिली आहेत. असे असताना आयुक्तांच्या आदेशानंतरही ठरावीक अधिकारी या बांधकामांकडे डोळेझाक करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.