नवी मुंबई पालिकेचे माजी आयुक्त भास्कर वानखेडे यांनी त्यांच्या दीर्घ आजारपणामुळे अनेक अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल न लिहिल्याने अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय पत्तीवार, शहर अभियंता मोहन डगांवकर, कर निर्धारक उपायुक्त प्रकाश कुलकर्णी यांच्या अतिरिक्त आयुक्तपदावर नगरविकास विभागाने रोख लावली असून अगोदर गोपनीय अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
नवी मुंबई पालिकेत शासनाच्या वतीने प्रतिनियुक्तीवर अनेक अधिकारी आले असून त्यातील अंकुश चव्हाण हे अतिरिक्त आयुक्त म्हणून पदभार सांभाळत आहे. चव्हाण यांची शासनाने अतिरिक्त आयुक्त म्हणून थेट नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे या पदासाठी इतर अधिकारी हे पालिका सेवेतील राहणार आहेत. डॉ. संजय पत्तीवार हे अतिरिक्त आयुक्त असले तरी त्यांना शासनाची मान्यता नाही. ते पालिकेच्या सर्वसाधारण सभेने दिलेल्या मंजुरीनंतर अतिरिक्त आयुक्त म्हणून कामकाज पाहात आहेत. पालिकेकडून त्यांच्या प्रस्तावासह शहर अभियंता पदाचा गेली अनेक वर्षे पदभार सांभाळणारे मोहन डगांवकर व पालिकेच्या करवसुलीची धुरा सांभाळणारे प्रकाश कुलकर्णी यांना अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने नगरविकास विभागाकडे पाठविला आहे, पण या तिन्ही अधिकाऱ्यांच्या प्रस्तावात माजी आयुक्त भास्कर वानखेडे यांचा गोपनीय अहवालावर अभिप्राय नोंद नसल्याचे उघडीस आले आहे. वानखेडे हे पालिकेच्या सेवेतून निवृत झाल्यानंतर काही महिन्यांतच त्यांचा कर्करोगाने मृत्यू झाला. त्यापूर्वी पालिकेत असताना आठ ते नऊ महिने ते आजारपणामुळे घरातूनच कारभार पाहत होते. त्या काळात केवळ महत्त्वाच्या कामांच्या फाईल्सवर सहय़ा केल्या जात होत्या. त्यामुळे अधिकाऱ्यांचा गोपनीय अहवाल लिहिणे राहून गेल्याने आता पदोन्नतीच्या वेळी ही बाब उघड झाली आहे. अशा प्रकारे अनेक अधिकाऱ्यांना त्यांच्या या अहवाल शिफारशीची अडचण येणार आहे. त्यासाठी इतर समकक्ष अधिकाऱ्याला हा अहवाल लिहिण्याची अनुमती नगरविकास विभाग देण्याची शक्यता आहे. पालिकेच्या स्थापनेला आता जवळपास २५ वर्षांचा कालावधी होत आला असल्याने अनेक अधिकारी निवृत्ती किंवा पदोन्नतीच्या जवळ आले आहे. त्यामुळे कामगार संघटनेनेही या पदोन्नती लवकर देण्याची मागणी केली आहे.