घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत पाश्र्वगायिका अनुराधा पौडवाल यांच्या सुनेने दाखल केलेल्या तक्रारीप्रकरणी पौडवाल यांचे प्रतिवादी म्हणून नाव वगळण्याचा कुटुंब न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द करीत पौडवाल यांना प्रतिवादी करण्याचे आदेश दिले. पौडवाल यांच्या सुनेने घटस्फोटासाठी कुटुंब न्यायालयात अर्ज करताना पती तसेच अनुराधा पौडवाल यांच्याविरुद्ध घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गतही तक्रार दाखल केली होती. परंतु पौडवाल यांना विनाकारण प्रतिवादी करण्यात आल्याचे सांगत कुटुंब न्यायालयाने त्यांचे नाव वगळले होते. त्यावर पौडवाल यांच्या सुनेने उच्च न्यायालयात धाव घेत  कुटुंब न्यायालयाने चुकीच्या पद्धतीने निर्णय दिल्याचा आरोप केला होता. न्यायमूर्ती विजया कापसे-ताहिलरामाणी आणि न्यायमूर्ती ए. आर. जोशी यांच्या खंडपीठाने कुटुंब न्यायालयाचा निर्णय अमान्य करीत पौडवाल यांना घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत प्रतिवादी करण्याचे स्पष्ट केले.