पनवेल नगर परिषदेने उशिरा का होईना बेकायदा बांधकामांवर कारवाईचा हातोडा बुधवारी चालवण्यास सुरुवात केली. पनवेल येथील तक्का परिसरात ही कारवाई करण्यात आली. नगर परिषदेत अनेक मुख्याधिकारी आले नि गेले, मात्र अनेक वर्षांनंतर बेकायदा बांधकामे रोखण्यासाठी कारवाई शून्य होती. मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी बेकायदा बांधकामावर कारवाईचा हातोडा चालवल्याने जमिनी बळकावणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
पनवेल तक्का परिसरातील भूखंड क्रमांक ४१४ व ४१५ वर ही बांधकामे थाटून त्यावर गाळे, झोपडय़ा बांधण्यात आल्या होत्या. मटणवाले, भंगारवाल्यांनी येथे आपले बस्तान मांडले होते. नगर परिषदेचा या जागेवर प्रशासकीय इमारत व उद्यान बांधण्याचा विचार आहे. चितळेंच्या पथकाने कारवाईचा हातोडा उगारल्यावर या झोपडय़ा व गाळेधारकांनी वीजबिलाच्या पुराव्याचे दस्तावेज चितळे यांना दाखविले, मात्र गेल्या दोन ते तीन वर्षांत निर्माण केलेल्या पुराव्यांपुढे चितळेंची कारवाई काही थांबली नाही. या झोपडय़ांना व गाळे बांधकामे करणाऱ्या आश्रयदात्याची चर्चा परिसरात होती. गाळ्यांचे भाडे घेणारे दाते गेले कुठे यावर चितळे यांचा कटाक्ष होता. तक्का परिसराप्रमाणे चितळे यांचा हातोडा शहरातील बेकायदा बांधकामे व पदपथावरील अतिक्रमण हटविल्यास पनवेलचे विद्रूपीकरण थांबेल, अशी सामान्य पनवेलकरांची प्रतिक्रिया आहे.