मालमत्ता करवाढ केल्यानंतर विरोधकांसह नागरिकांच्याही रोषाचा सामना करावा लागत असताना महापालिका प्रशासनाने फिजिओथेरपी सेवेचे दर अडीच पटीने वाढविण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. एवढेच नव्हे तर फिजिओथेरेपीसाठी नोंदणी शुल्कातही पाचपटीने वाढ केली जाणार असल्याने सामान्य नागरिकांची आरोग्य सुविधा महागणार आहे.
महापालिकेने नुकताच मालमत्ता करामध्ये चार नव्या करांचा समावेश करून आर्थिक ओझे लादले आहे. आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील दराचा आधार घेत सामान्य नागरिकांना धक्का देण्याचे संकेत महापालिका प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे महापालिका नागरिकांच्या सोयीसाठी आहे की व्यवसायासाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे. सामान्य नागरिकांना अल्प दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिकेची जबाबदारी आहे. परंतु महापालिकेने ही सुविधा महाग करण्याचा प्रस्ताव तयार केला असून तो १९ मार्चला होणाऱ्या सभेत मंजुरीसाठी येणार आहे. या प्रस्तावांतर्गत महाल येथील रोग निदान केंद्रात फिजिओथेरेपी सेवेसाठी येणाऱ्या रुग्णांना फटका बसणार आहे. सध्या १२ रुपये आकारण्यात येते. या सेवेसाठी आता प्रत्येकी ३० रुपये आकारण्यात येणार आहे. याशिवाय नोंदणी शुल्क पाचपटीने वाढविण्यात येणार असून दोन रुपयांऐवजी दहा रुपये नागरिकांना द्यावे लागणार आहे.