यावर्षी जिल्हावासीयांनी भीषण दुष्काळाचा सामना केल्यामुळे सर्वानाच पावसाची आतरुतेने प्रतीक्षा लागून होती. यावर्षी हवामान खात्याचा अंदाज, तसेच भेंडवळच्या घटमांडणीचे भाकीतही सकारात्मक असल्याने पावसाळा चांगला जाणार असल्याचे संकेत मिळाले होते. त्यात आता गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्य़ात सर्वदूर दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून त्यांचा पेरणीचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्य़ात बहुतांश भागात आता पेरणीला सुरुवात झाल्याने शेतशिवारात शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे.
यावर्षी दुष्काळाचे संकट व पाणीटंचाईचा मोठा फटका जिल्हावासीयांना बसला. गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात कमालीची घट झाली. त्यामुळे शेतकरी पुरते हैराण झाले होते.
किमान यावर्षी तरी निसर्गाने वरदहस्त ठेवत वरुणराजाने कृपा करावी, अशी अपेक्षा प्रत्येक शेतकऱ्यांची होती. त्यातच मान्सूनची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर गेल्या काही दिवसांपासून पावसाने सातत्याने हजेरी लावल्याने समाधान प्राप्त झाले आहे.
आता १४ जून व १५ जूनला जिल्ह्य़ात सर्वत्रच जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. या पावसाने बऱ्याच ठिकाणच्या नदी, नाल्यांमध्ये पाणी वाहिले आहे. बऱ्याच धरणांचा आणि सिंचन तलावांचा जलसाठाही वाढला आहे. शेतीशिवारात पावसाने जमिनीची तहान शांत केल्याने आता जमिनीचा सुगंध शेतकऱ्यांना आपसूकच शेतांकडे आकर्षित करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा पेरणीचा मार्ग मोकळा झाला असून शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. पीककर्जाचा प्रश्न बऱ्याच अंशी कायम असला तरी उसनवार, दागिने गहाण ठेवून व शक्य त्या प्रयत्नांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पेरणीची सोय केली असून आता प्रत्येक भागातील शेतशिवारात पेरणीची लगबग आणि बैलांच्या गळ्यातील घटांचा नांद घुमताना दिसत आहे.
यावर्षीच्या दुष्काळाला संकट न मानता त्यातूनही चांगले कामे करण्याचा सपाटा प्रशासनाने लोकसहभागाच्या माध्यमातून लावला होता.
त्यामुळे जिल्ह्य़ात जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये धरण, गावतलाव, पाझर तलाव, सिंचन तलावांमधून गाळ काढण्याची मोहीम राबविण्यात आली.
विशेष करून बुलढाणा तालुक्यात जिल्हा मुख्यालयातील येळगाव धरणासोबतच तब्बल ३५ तलावांमधील गाळ काढण्यात आल्याने हजारो शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात गाळ टाकला आहे.
शेतात टाकलेल्या धरण आणि तलावांमधील गाळामुळे आपसूकच जमिनीची पोत आणि सुपिकता वाढल्याने खतांची अधिक गरज भासत नाही. त्यामुळे खतांवरील बराचसा खर्च कमी झाल्याने शेतकऱ्यांचा भार काही प्रमाणात हलका झाला असल्याचे शेतकरी सांगत आहेत. एकूणच या समाधानकारक पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.