आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने रिक्षा, टॅक्सी आणि बस चालकांच्या मुलांना उच्च शिक्षण घेताना अडचणी येतात. अनेकदा पैशाअभावी चांगली गुणवत्ता असूनही ते उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. आता महानगर गॅस कंपनीने अशा मुलांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, कल्याण आणि अंबरनाथ या शहरातील रिक्षा, टॅक्सी आणि बस चालकांच्या दहा मुलांची निवड करण्यात आली आहे. मुंबई महानगर प्रदेश परिसरात रिक्षा टॅक्सी आणि बसचालकांचे दैनंदिन उत्पन्न अत्यंत अल्प असल्याने त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक असते. दैनंदिन गरजा पूर्ण कराताना मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पुरेसे पैसे जमा करणेही त्यांना अवघड जाते. त्यामुळे शक्य होईल तेवढेच शिक्षण देऊन मुलांना रोजगार शोधण्यासाठी सुरुवात केली जाते. या प्रकारामुळे चांगली गुणवत्ता असूनही केवळ आर्थिक परिस्थितीमुळे मोठी स्वप्ने बाजूला ठेवून वेगळ्या वाटा स्वीकारण्याची वेळ या विद्यार्थ्यांवर येते. आता ‘महानगर गॅस’ गुणवत्ता असलेल्या या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार आहे. सेंट्रल फॉर सोशल रिस्पॉन्सबिलीटी अ‍ॅण्ड लिडरशिप या सामाजिक संस्थेच्या मदतीने हा उपक्रम कार्यान्वित करण्यात आला. सीएनजी वापरणाऱ्या रिक्षा, टॅक्सी आणि बस सेवांच्या चालकांना या उपक्रमांची माहिती देऊन त्यांच्या मुलांसाठी एका ऑनलाइन निवड प्रक्रिया राबवण्यात आली. त्यानंतर त्यांची लेखी परीक्षा घेऊन जून महिन्यामध्ये या भागातील दहा मुलांची निवड करण्यात आली. त्यामध्ये सहा मुले आणि चार मुलींचा समावेश असून ठाण्यातील घोडबंदर परिसरामध्ये त्यांना पुढील ११ महिने इंजिनीअरिंगच्या निवड प्रक्रियेचे मार्गदर्शन केले जाणार आहे.
या विद्यार्थाना आयआयटी आणि एनआयटी त्याचबरोबर राज्यातील इंजिनीअरिंग कॉलेजच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशिक्षित केले जाणार आहे. त्यासाठी आयआयटीमधील मान्यवर प्राध्यापकांचे मार्गदर्शन त्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी महानगर गॅसच्या वतीने सर्वतोपरी मदत केली जाणार असून गुणवत्तापूर्ण शिक्षण त्यांना दिले जाईल, अशी माहिती उपक्रमात सहभागी सामाजिक संस्थेचे एस के शाही यांनी दिली.