आधी सायकलच्या दरपत्रकावरून निर्माण झालेला वाद, नंतर सायकल खरेदीस सरकारकडून स्थगिती, यात चालू शैक्षणिक वर्षांतील केवळ काही महिनेच बाकी असताना जिल्हय़ातील १ हजार ८०० लाभार्थी विद्यार्थिनी प्रत्यक्षात सायकलपासून वंचित असे चित्र मानव विकासांतर्गत सायकल वाटप योजनेबाबत पाहावयास मिळत आहे.  
इयत्ता आठवी ते बारावीच्या गरजू विद्यार्थिनींना मानव विकासांतर्गत सायकलींचे वाटप होणार होते. परंतु सुरुवातीला सायकलच्या दरपत्रकाचा मुद्दा गाजला. परिणामी सरकारने सायकल खरेदीला स्थगिती दिली. आता चालू शैक्षणिक वर्ष संपत आले असताना गरजू विद्यार्थिनी सायकलींपासून वंचित आहेत. हिंगोली, सेनगाव व औंढा नागनाथ तालुक्यांतील १ हजार ८०० लाभार्थी विद्यार्थिनींची निवड यात करण्यात आली होती. सायकली खरेदीसाठी सुमारे ६ लाखांचा निधी प्राप्त झाला. तीन तालुक्यांतील ६०० लाभार्थीची निवड करण्यात आली. परंतु कोणत्या कंपनीच्या सायकली खरेदी करायच्या व दर निश्चितीचा करार नसल्याचा मुद्दा आडवा आला.
दर निश्चितीच्या कराराचा मुद्दा सुटतो न सुटतो तोच, आता सरकारकडून सायकल खरेदीप्रकरणी स्थगिती देण्यात आल्याने सायकलींपासून लाभार्थी विद्यार्थिनी दूरच आहेत. जानेवारी निम्मा सरला. फेब्रुवारीमध्ये बारावीच्या परीक्षा, त्यानंतर इतर इयत्तांच्या परीक्षा होतील. शैक्षणिक वर्ष संपण्यास शेवटचे ३ महिने बाकी असल्याने मानव विकासांतर्गत योजनेच्या सायकलींपासून हिंगोली, सेनगाव व औंढा नागनाथ तालुक्यांतील १ हजार ८०० गरजू विद्यार्थिनींना सायकली मिळणे दुरापास्तच ठरणार असल्याचे चित्र आहे.