गत विधानसभा निवडणुकीवेळी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार केला होता. काँग्रेस नेत्यांची स्वतंत्र लढण्याची इच्छा असेल त्यास राष्ट्रवादीचीही तयारी आहे. धनंजय महाडिक यांची लोकसभेची उमेदवारी जाहीर करायला मी मालक नाही, त्यासाठी प्रयत्न करू असे केवळ आश्वासन दिले होते, असे प्रतिपादन कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांंचे चिंतन शिबिर १ फेब्रुवारीला पन्हाळा येथे होणार आहे. या पाश्र्वभूमीवर येथे आयोजित केलेल्या बैठकीवेळी ते बोलत होते. याचवेळी जिल्हाध्यक्ष आमदार के.पी.पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्य़ातील दोंन्ही लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचाच हक्क असल्याने काँग्रेस पक्षाने एकही जागा मागण्याचा मुद्दाच उद्भवत नसल्याचे स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश निरीक्षक आमदार रमेश शेंडगे यांच्या उपस्थितीत ही बैठक राष्ट्रवादीच्या कार्यालयात झाली. या वेळी ते म्हणाले,‘‘पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांच्या या शिबिरामुळे सामान्य कार्यकर्त्यांना आमची भूमिका मांडण्याची संधी मिळणार आहे. पक्षात कोणाही कार्यकर्त्यांला नेत्यांकडून डावलण्याचा प्रयत्न होणार नाही. त्यामुळे हे शिबिर यशस्वी करण्यासाठी जिल्ह्य़ातील कार्यकर्त्यांनी जोमाने प्रयत्न करावेत.’’
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पक्ष बांधणीकडे अधिक लक्ष पुरविले आहे. त्यासाठी विविध ठिकाणी व्यापक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, असा उल्लेख करून मंत्री मुश्रीफ म्हणाले,‘‘३ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे अल्पसंख्याकांसाठी शिबिर होणार आहे. तर १६ मार्च रोजी हातकणंगले येथे राज्यस्तरीय महिला मेळावा होणार आहे. चंदगड मतदारसंघातील पोट निवडणुकीचा उमेदवार निवडण्याची चर्चा सुरू झाली असून लवकरच त्याची घोषणा होणार आहे.’’
शाहू मिलमध्ये राजर्षी शाहू स्मारक उभे राहावे, यासाठी नागपूर अधिवेशनात प्रश्न उपस्थित केल्याबद्दल जिल्हाध्यक्ष आमदार के.पी.पाटील यांचा सत्कार मंत्री मुश्रीफ यांच्याहस्ते करण्यात आला. उपमहापौर सचिन खेडकर, स्थायी समिती सभापती राजेश लाटकर यांचाही सत्कार करण्यात आला. बैठकीत अॅड.अशोकराव साळोखे, व्यंकप्पा भोसले, जयकुमार शिंदे, संगीता खाडे यांची भाषणे झाली. स्वागत अनिल साळोखे, प्रास्ताविक शहराध्यक्ष आर.के.पोवार यांनी केले. माजी आमदार नामदेवराव मोहिते, संग्रामसिंह कुपेकर, विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, बाबुराव हजारे, चंद्रकांत बोंद्रे, धैर्यशील माने, अरूण इंगवले आदी उपस्थित होते.