इचलकरंजी शहरातील विस्तारलेले क्षेत्रफळ व वाढती लोकसंख्या विचारात घेता गुन्हेगारी नियंत्रणात आहे, असे मत व्यक्त करून पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी पोलीस यंत्रणेचे कामकाज सांभाळून घेतानाच इचलकरंजीतील बेशिस्त वाहतुकीस नगरपालिकेचे दुर्लक्ष कारणीभूत आहे, असे सांगून स्थानिक स्वराज्य संस्थेकडे त्याची जबाबदारी ढकलली.    
पोलीस ठाण्यांच्या वार्षिक तपासणीसाठी विजयसिंह जाधव इचलकरंजीत आले होते. त्यानंतर नगरपालिकेच्या जुन्या इमारतीच्या सभागृहात नागरिक व पत्रकारांशी संवाद साधला. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दुर्योधन पवार यांनी बैठकीचा उद्देश सांगितला.    
कामगार नेते मिश्रीलाल जाजू, शिवसेना शहर प्रमुख धनाजी मोरे, महिला महासंघाच्या माजी अध्यक्षा शशिकला बोहरा, सुरेखा लोहार, प्रकाश बागेवाडीकर, संतोष कामटे यांनी महिलांच्या समस्या, विस्कळीत वाहतूक, गुटखा बंदी आदी समस्या मांडल्या.     
यावेळी जाधव म्हणाले, गतवर्षीच्या तुलनेने गुन्हेगारी कमी झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. समाज जागृत झाला तर गुन्हेगारीचे प्रमाण कमी होणार आहे. पोलीस समाजसुधारकाचे काम करू शकत नसल्याने नागरिकांनीच आपल्या अधिकार व कर्तव्याची जाणीव ठेवून दैनंदिन व्यवहार करणे आवश्यक आहे. शासनाकडून येणाऱ्या निधीतील १० टक्के रक्कम वाहतूक व्यवस्थेसाठी खर्च करणे अपेक्षित आहे. तसे या शहरात होत नसल्याने वाहतूक यंत्रणा विस्कळीत झाली आहे, याकडे नगरपालिकेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी गांभीर्यपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. यावेळी गावभागचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्यासह पोलीस अधिकारी, नागरिक उपस्थित होते.