* महापालिकेकडून भूमाफियांची यादी प्रसिद्ध
* मुंब्रा आघाडीवर ’ शासकीय जमिनींवर चाळी ’ नवी मुंबई, कल्याणही अपवाद नाही
बस्स आता पुरे झाले (इनफ अज इनफ)! अशी आक्रमक भाषा वापरत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नव्याने उभ्या राहणाऱ्या बेकायदा बांधकामांवर हातोडा चालवा, अशी जाहीर भूमिका घेतली असली तरी पवारांचे पट्टशिष्य म्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचित असणारे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा मतदारसंघात अजूनही बेकायदा बांधकामांचे इमले उभे राहात असल्याचे धक्कादायक चित्र पुढे येऊ लागले आहे.
 मुंब्रा शीळ येथील दुर्घटनेत ७४ निष्पाप व्यक्तींचा बळी गेल्यानंतर ठाणे महापालिका क्षेत्रातील बेकायदा बांधकाम किमान काही दिवस तरी थांबेल, ही अपेक्षाही फोल ठरू लागली आहे. ठाणे, कळवा, मुंब्रा अशा वेगवेगळ्या विभागांमध्ये बेकायदा बांधकामे करणारे बिल्डर, भूमाफिया, गावगुंडांची भली मोठी यादी ठाणे महापालिकेने नुकतीच प्रसिद्ध केली. त्यामध्ये आव्हाड यांच्या मुंब्रा, कळवा मतदारसंघातील भूमाफिया, बिल्डरांची भलीमोठी रांग दिसून येते. कळवा, मुंब््रयासह वागळे, रायलादेवी, कोपरी हे शिवसेनेचे बालेकिल्ले म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात बेकायदा बांधकामे करणारे तसेच त्यांना सहाय्य करणाऱ्या सुमारे २०४ व्यक्तींचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. या सर्वाकडून कोणत्याही स्वरूपाची मालमत्ता खरेदी करू नये, असे आवाहन महापालिकेने केले असले तरी यादीत समावेश असलेले बहुतांश बिल्डर, भूमाफिया अजूनही मुंब्रा, शीळ, दिवा, डायघर भागांत बेकायदा बांधकामे करत असल्याची धक्कादायक माहिती पुढे येऊ लागली आहे. मुंब््रयातील ठाकूरपाडा, शैलेशनगर, सम्राटनगर या भागांत तर आठ ते नऊ मजल्यांच्या बेकायदा इमारतींचे काम सुरू असल्याचे चित्र आहे. महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या यादीत या बांधकामांची सद्यस्थिती नमूद केली आहे.
मुंब्रा आघाडीवरच..
मुंब््रयातील रौफ, जे. के. कन्स्ट्रक्शन, नईम खान, चाँद इनामदार, दिनेश किणे, मनोहर किणे अशी काही परिचित नावे बेकायदा बांधकामे करण्यात आघाडीवर असून अशा बिल्डरांकडून घर खरेदी का नका, असे आवाहन महापालिकेने केले आहे. या यादीतील काही नावे राजकीय नेत्यांशी संबंधित असून अशा व्यक्तींमार्फत होत असलेल्या बांधकामांना राजकीय संरक्षण असते हे यापूर्वीच उघड झाले आहे. ही यादी प्रसिद्ध करताना सदर व्यक्तींमार्फत सुरू असलेल्या बांधकामांची सद्यस्थिती अहवालही महापालिकेने जाहीर केला असून त्यापैकी काही बांधकामे अद्यापही सुरू असल्याची धक्कादायक माहिती उघड होत आहे. अर्धवट अवस्थेत असलेल्या ही बांधकामे जमीनदोस्त करण्याची कारवाई लवकर उरकणे आवश्यक आहे. या यादीतील काही बांधकामांवर कारवाईची प्रक्रिया सुरू असली तरी काही बांधकामांचे इमले मात्र अजूनही उभे राहात असल्याचे चित्र आहे. कळव्यात शासकीय जमिनींवर चाळी उभारण्याचे उद्योगही सुरूच आहेत. या ठिकाणी काही भागात खारफुटींची कत्तलही अद्याप थांबलेली नाही.
बेकायदा बांधकामे करणाऱ्यांची संख्या
मुंब्रा  १३३, वागळे  १२, नौपाडा  ४, रायलादेवी  ३५, माजिवडा  ४, कळवा  ५ , कोपरी  ६