पोलीस व जिल्हा प्रशासनाने वाळू माफियांविरुद्ध कारवाईचा बडगा कायम ठेवला असतानाच अपुरे मनुष्यबळ तसेच प्रशासनातीलच काहींच्या हातमिळवणीमुळे वाळूचे अवैध उत्खनन मात्र कमी झालेले नाही.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खापरखेडाजवळच्या वलनी वाळू घाटात वाळू उपसा सुरू झाल्याच्या माहितीवरून तेथे पोहोचलेल्या महसूल खात्याच्या पथकावर वाळू माफियांनी हल्ला केल्याची घटना घडली असून याप्रकरणी अनोळखी आरोपींविरुद्ध खापरखेडा पोलिसांनी गुन्हे दाखल केले. वलनी वाळू घाटात पोकलँड यंत्राद्वारे वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळताच शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास मंडळ अधिकारी प्रकाश हारगुडे, तलाठी राजेश बारापात्रे, कोतवाल नीलेश बोबडे व पोलीस शिपाई हेमंत रंगारी आदी तेथे पोहोचले. वाळू भरलेला एक ट्रक (एमएच/४०/वाय/१५९५) या पथकाला येताना दिसला. या पथकाला पाहताच ट्रक चालक पळून गेला.
पंचनामादी कार्यवाही सुरू असतानाच सुमारे पंधराजण तेथे आले. त्यांच्या हातात शस्त्रे होती. त्यापैकी चार-पाचजणांनी पोलीस शिपायाच्या हातातील काही हिसकावून बाजूला नेत त्याला धक्काबुक्की करीत धमकी दिली. त्यानंतर राजेश बारापात्रे व नीलेश बोबडे या दोघांना त्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर कुणीतरी एक वाळू माफिया तेथे आला. त्याने या पथकाशी तडजोडीची भाषा केली. ट्रक रिकामा करून माफिया तेथून निघून गेले. या घटनेने हे पथक हादरून गेले. स्वत:ला सावरून घेत पथक खापरखेडा पोलीस ठाण्यात गेले. तेथपर्यंत माफियांनी पाठलाग केला. पोलीस ठाण्यात गेल्यावर या पथकातील कर्मचाऱ्यांना तक्रार लिहून देण्यास सांगत रात्रपाळीवरील पोलीस अधिकारी घटनास्थळी जात असल्याचे सांगत निघून गेला. त्यानंतर कुणीतरी दोन वाळू माफिया पोलीस ठाण्यात आले व पुन्हा तडजोडीची भाषा करू लागले. त्यामुळे या पथकातील कर्मचारी परत गेले. दुसऱ्या दिवशी रविवारी तहसीलदार रवींद्र माने यांच्यासह हे पथक खापरखेडा पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांनी तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रक चालक व मालक तसेच दोन अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले.  
या परिसरातील वाळू घाटांवर लतीफ नावाच्या वाळू माफियाचे वर्चस्व असून त्याच्या सर्वच ट्रक्सच्या क्रमांकामध्ये ९५ हा क्रमांक असल्याची माहिती पोलिसांना नाही, यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. या घटनेतील ट्रक अद्यापही जप्त करण्यात आलेला नाही. ट्रक बाहेरगावी पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांना आहे. या घटनेत सुमारे पंधराजण असल्याचे या पथकातील कर्मचाऱ्यांना वाटते तर मग गुन्हा फक्त चौघांविरुद्धच का दाखल करण्यात आला, आदी प्रश्न निर्माण झाले आहेत. यापूर्वी एका तहसीलदारास वाळू माफियांकरवी मारहाण झाली आहे. भिवापूरपासून जवळच पवनी व त्या परिसरातील वाळू घाटांवरून वाळू तसेच खाणींमधून गिट्टीची वाहतूक नागपूर शहराकडे रोज होते. यातील बहुतांश ट्रक हे विनास्वामित्व शुल्काचे असतात, या माहितीवरून महसूल खात्या पथकाने तेथे कारवाई करीत २७ ट्रक जप्त केले. १ लाख ४२ हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त केला.
‘कायद्यानुसार वाळूचोरीवरील कारवाईसंदर्भात पोलिसांना मर्यादित अधिकार आहेत. महसूल तसेच परिवहन खात्यावर सर्वाधिक जबाबदारी आहे. याचा अर्थ पोलिसांवर जबाबदारी नाही, असे नाही. सर्वाधिक तक्रारी येतात त्या वाळू घाटांवर पोलीस चौकी स्थापन केली जाईल. तेथे पोलिसांशिवाय महसूल तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी तैनात असतील’ असे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. आरतीसिंह फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस रुजू होताना म्हणाल्या होत्या. त्यांनी वाळू माफियांविरुद्ध कारवाईचा सपाटा लावला. काहीजणांना हद्दपारही करण्यात आले. अधूनमधून विविध ठिकाणी वाळू चोरीचे गुन्हे दाखल होत आहेत. मात्र, जप्त वाळूचे प्रमाण फारसे नाही.
पोलीस व जिल्हा प्रशासनाने वाळू माफियांविरुद्ध कारवाईचा बडगा कायम ठेवला असला तरीसुद्धा वाळू चोरीचे प्रमाण कमी झालेले नाही. पोलीस अधीक्षकांसह काही पोलीस तसेच प्रशासनातील काही अधिकारी वाळू चोरीविरोधातील कारवाईबाबत गंभीर व प्रामाणिक असले तरी अपुरे मनुष्यबळ तसेच प्रशासनातीलच काहींच्या हातमिळवणीमुळे वाळूचे अवैध उत्खनन मात्र कमी झालेले नाही. रोज विविध ठिकाणी दाखल होणारे गुन्हे याचेच द्योतक आहे.