शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या ‘दादा-मामा-काका-भैय्या’च्या फलकांकडे गेली अनेक वर्षे डोळे मिटून पाहणाऱ्या महापालिकेची उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आज झोप उडाली व सकाळपासूनच शहरातील फलक काढायला सुरूवात झाली. तरी फक्त सावेडी उपनगरातीलच फलक आज काढून झाले. तेवढय़ानेही तो परिसर स्वच्छ दिसू लागला.
नागरिकांनी उच्च न्यायालयाच्या या आदेशाचे स्वागतच केले. कापडबाजारातील स्विट होम चे संचालक आनंद बोगावत यांनी सांगितले की राज्यातील सगळ्या शहरांचे सौंदर्यच हा फ्लेक्समध्ये हरवले होते. सर्वोच्च न्यायालयाने रात्री १० नंतर सार्वजनिक ठिकाणी जाहीरपणे ध्वनीवर्धक वाजवण्यावर बंदी घातली. गणेशोत्सवातच काय पण अन्य कोणत्याही उत्सवात या नियमाचे पालन होते. त्याच प्रकारचा हा फ्लेक्स हटाव चा उच्च न्यायालयाचा निर्णय असल्याचे मत बोगावत व त्यांच्या सहकारी मित्रांनी व्यक्त केले. त्याची कडक अंमलबजावणी होईल अशी आशा त्यांनी बोलून दाखवली.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी सांगितले की सकाळीच सावेडी प्रभागाच्या मागणीनुसार त्यांच्याकडे एक पथक तयार करून पाठवण्यात आले. सायंकाळपर्यंत त्यांची कारवाई सुरू होती. पाईललाईन रस्ता व त्याच्या आसपासचा सगळा परिसर यात स्वच्छ करण्यात आला. या भागात अनेक कारणांनी अनेक लहानमोठय़ा नेत्यांचे फलक लागत असता. त्यासाठी मनपाची परवानगी वगैरे कधीही घेतली जात नव्हती असे इथापे म्हणाले.
मनपाच्या ६५ प्रभागांचे म्हणजे संपुर्ण शहराचे ४ विभाग केले आहेत. प्रत्येक विभागाला १ प्रभाग अधिकारी व त्यांना सहायक कर्मचारी वर्ग दिलेला आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रातील असे फलक काढण्याची जबाबदारी प्रभाग अधिकाऱ्यांची आहे असे आयुक्त स्तरावरून त्यांना वारंवार कळवून झाले आहे. मात्र त्याप्रमाणे कारवाई होत नाही असे इथापे यांनी सांगितले. आता उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे बंधन मनपावर आले आहे. त्यामुळे ही कारवाई पुढेही सुरूच राहील असे ते म्हणाले. शहराच्या मध्यवर्ती भागातील फलकही यात काढण्यात येणार आहेत, मनपाच्या कारवाईपुवी ते ज्यांचे आहेत त्यांनी स्वत:च उतरवून घ्यावेत असे आवाहन इथापे यांनी केले.