मुंबई विद्यापीठात विविध प्रकारची माहिती मिळवण्याच्या उद्देशाने येणाऱ्या विद्यार्थ्यांला एका क्लिकवर माहिती उपलब्ध व्हावी यासाठी लाखो रुपये खर्चून प्रशासनाने कालिना आणि फोर्ट संकुलात माहिती यंत्रे बसविली आहेत. पण प्रत्यक्षात ही यंत्रे बंद पडली असून याचा विद्यार्थ्यांना काहीच उपयोग होत नाही.
मुंबई विद्यापीठाचे प्रवेश, परीक्षा वेळापत्रक, निकालाची माहिती, अधिकचे वर्ग, विविध प्रकारचे कार्यक्रम, कार्यशाळा इत्यादी माहिती विद्यार्थ्यांना एका क्लिकवर उपलब्ध व्हावी या उद्देशाने विद्यापीठाच्या फोर्ट आणि कालिना संकुलात पाच माहिती यंत्रे बसविण्यात आली आहेत. मात्र कालिना संकुलातील परीक्षा भवन आणि आयडॉलच्या इमारतींमध्ये बसविण्यात आलेली चार यंत्रे बंद पडल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याची बाब विद्यापीठाचे अधिसभा सदस्य सुधाकर तांबोळी यांनी उघडकीस आणली. परीक्षा भवनातील दोन्ही यंत्रे बंद असून आयडॉलमधील एक यंत्र बंद आहे तर एका यंत्रात माहिती येत असताना ते मध्येच बंद पडत असल्याचे तांबोळी यांनी निदर्शनास आणले. मात्र कालिना संकुलातील यंत्रे सुरू असल्याचा दावा विद्यापीठ प्रशासन करत आहे. तर फोर्ट येथील यंत्रात माहिती अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा दावा विद्यापीठातील एका अधिकाऱ्याने केला आहे.