श्रेष्ठींचे आदेश डावलून नियोजन समितीच्या निवडणुकीत बंडाचा झेंडा रोवणाऱ्या जिल्हा परिषद सदस्या वत्सला पुयड यांची शिवसेना गटनेते पदावरून अखेर उचलबांगडी करण्यात आली. पक्षाच्या काही सदस्यांनी गद्दारी केल्याने संतप्त झालेल्या नागोराव इंगोले यांची गटनेतेपदी वर्णी लावण्यात आली.
जिल्हा नियोजन समितीच्या शनिवारी झालेल्या निवडणुकीची रविवारी मतमोजणी झाली. यात काँग्रेसचे वर्चस्व सिद्ध झाले असले, तरी शिवसेनेच्या तिन्ही उमेदवारांचा दारुण पराभव झाला. काँग्रेसच्या सहकार्याने शिवसेनेच्या वत्सला पुयड निवडणुकीत विजयी झाल्या. पक्षादेश डावलून पुयड यांनी एक प्रकारे श्रेष्ठींनाच आव्हान दिले. त्यांच्या बंडखोरीची पक्षाने गंभीर दखल घेत गटनेतेपदावरून दूर केल्याचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारावार यांनी सांगितले. शिवसेनेत बंडखोरी कधी खपवून घेतली जात नाही. पुयड यांची कृती नियमबाह्य़ होती. त्यामुळेच जि.प. गटनेतेपदावरून त्यांना दूर करण्यात आले.
जि.प. गटनेतेपदी आता मालेगाव येथील जि.प. सदस्य नागोराव इंगोले यांची वर्णी लावण्यात आली. शिवसेनेची मते फुटल्यामुळे इंगोले यांनी संतप्त होत राजीनामा दिल्याचे जाहीर केले होते. पण त्यांचे मन परिवर्तन करून त्यांना गटनेतेपदी नियुक्त करण्यात आले.
बालाजी पुयडला अटक
दरम्यान, एका वृत्तपत्र कार्यालयावर हल्ला केल्याप्रकरणी जि.प. सदस्या वत्सला पुयड यांचे दीर बालाजी पुयड याला शिवाजीनगर पोलिसांनी सकाळी अटक केली. या वृत्तपत्राचे प्रतिनिधी प्रल्हाद उमाटे यांनी तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी बालाजी पुयडविरुद्ध गुन्हा दाखल केला.
 पुयडच्या कृत्याचा पत्रकार संघाने तीव्र निषेध केला. पत्रकारांच्या शिष्यमंडळाने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन हल्लेखोरांवर कारवाईची मागणी केली. सकाळी पुयडला अटक करण्यात आली. सायंकाळी त्याची जामिनावर  मुक्तता   झाल्यानंतर    स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने प्रतिबंधात्मक कारवाईसाठी ताब्यात घेतले.