आपल्या मुलीप्रमाणे आजूबाजूला वावरणाऱ्या प्रत्येक मुलीच्या सुरक्षेसाठी समाजाने सतर्क आणि सक्रिय व्हावे, यासाठी ‘जेपीं’च्या आंदोलनातून जन्मलेली ‘जनमुक्ती संघर्ष वाहिनी’ नव्याने कार्यरत करण्याची योजना आहे. त्यासाठी मुंबईत २८ सप्टेंबरला पहिली बैठक घेण्यात येणार आहे. मुलींच्या सुरक्षेचा व्यापक अर्थाने विचार करण्याच्या दृष्टीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात पालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बिहार आंदोलनाच्या निमित्ताने ७०च्या दशकात अवघा देश ढवळून काढणाऱ्या लोकनेते जयप्रकाश नारायण यांच्या कार्यकर्त्यांनी १९९३ मध्ये ही संघटना स्थापन केली होती. जेपींच्या ‘छात्र युवा संघर्ष वाहिनी’मध्ये केवळ वयाच्या ३० वर्षांपर्यंत राहता येत होते. तिशीनंतर ही संघटना सोडावी लागे. म्हणून महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, ओरिसा येथील जेपींच्या कार्यकर्त्यांनी ‘जनमुक्ती संघर्ष वाहिनी’ची स्थापन केली. जातपात न मानणाऱ्या, स्त्री-पुरूष भेदभाव न करणाऱ्यांना कुणालाही या संघटनेत प्रवेश दिला जातो. दर तीन महिन्यांनी संघटनेचे पदाधिकारी भेटत असले तरी एखाद्या मोठय़ा कारणासाठी एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे वाहिनीचे संघटक डॉ. विवेक कोरडे यांनी सांगितले.
दिल्ली आणि शक्ती मिल सामूहिक बलात्काराच्या प्रकरणांमुळे महिलांवरील वाढत्या अत्याचारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रसारमाध्यमातूनही सातत्याने या प्रकारच्या घटनावृत्तांना प्रसिद्धी देऊन समाजजागृती केली जात आहे. पण, मुली किंवा महिलांवरील अत्याचार असे एकदम होत नाहीत. याची सुरूवात छेडछाडीने होते. मुलींच्या छेडछाडीचे प्रकार आपल्या आजुबाजूला होत असले तरी आपण त्यात हस्तक्षेप करीत नाही. पण, आता मुलींच्या सुरक्षेचा विचार व्यापक अर्थाने करण्याची वेळ आहे.
‘मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी काम पोलिस आणि सरकारी यंत्रणेचे आहेच. पण, समाज म्हणून आपलेही या संबंधात काही कर्तव्य आहे. कारण,  मुलींच्या सुरक्षिततेचा असा कुटुंबकेंद्री विचार न करता सामाजिक प्रश्न म्हणून गेला पाहिजे. त्यासाठी ‘जनमुक्ती संघर्ष वाहिनी’च्या माध्यमातून प्रयत्न केले जातील,’ अशी प्रतिक्रिया कोरडे यांनी दिली. त्यासाठीची पहिली बैठक २८ सप्टेंबरला ग्रँट रोड येथील ‘मुंबई सवरेदय मंडळ’ येथे पार पडेल. त्यात मुलींची सुरक्षितता हा विषय केंद्रस्थानी असेल. सायंकाळी ५ वाजता ही बैठक होईल.