निम्म्याहून अधिक काम बाकी असताना काँग्रेस नगरसेवकाच्या पुढाकारातून बुधवारी आयोजित कार्यक्रमात पंचवटीतील औरंगाबाद रस्त्यावर जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या ७६० सदनिकांचा लोकार्पण सोहळा वाजतगाजत पार पडला. प्रमुख मान्यवरांनी महत्वाकांक्षी योजना पूर्ण झाल्यामुळे ७६० कुटुंबियांच्या चेहेऱ्यावर हास्य उमटल्याची भावना व्यक्त केली. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात पाच लाभार्थीना सदनिकांची चावी देण्यात आली. इमारतींचा सुंदर चेहरा समोर दिसत असल्याने पाहुण्यांनी आपल्या भाषणांमध्ये त्याचेच वर्णन करणे योग्य समजले असले तरी योजनेचे बरेच काम बाकी असल्याने इमारतींचा दुसरा चेहरा त्यांच्यासमोर आलाच नाही. काँग्रेसच्या पुढाकारातून झालेल्या या सोहळ्यास राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी दांडी मारली. या परिस्थितीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि पालिकेतील सत्ताधारी मनसेकडून योजनेच्या श्रेयासाठी धडपड सुरू असल्याचे पहावयास मिळाले.
औरंगाबाद रस्त्यावरील निलगीरी बाग परिसरात २६ कोटी २९ लाख रुपयांच्या खर्चाची ७६० सदनिकांची ही योजना आहे. या सर्व घरांचे काम पूर्णत्वास गेल्याच्या थाटात हा लोकार्पण सोहळा झाला. याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महापौर अ‍ॅड. यतिन वाघ उपस्थित होते. काम पूर्ण होण्याआधी लोकार्पण करण्यास राष्ट्रवादीचा विरोध होता. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करुन स्थायी समितीचे माजी सभापती उध्वव निमसे यांनी परस्पर या सोहळ्याचे आयोजन केल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता होती. वरिष्ठ नेत्यांची अनुपस्थितीत हेच दर्शवून गेली.
यावेळी थोरात यांनी उपरोक्त लाभार्थीसाठी आजचा दिवस खऱ्या अर्थाने दिवाळीचा असल्याचे सांगितले. प्रत्येकाच्या आयुष्यात आपले स्वत:चे घर असावे असे स्वप्न असते. केंद्र शासनाच्या योजनेमुळे घरकुलाचा आनंदाचा योग साधला गेला. केंद्र व राज्य शासनाकडून आलेल्या निधीचा महापालिकेने योग्य पध्दतीने वापर करावा.
सर्वसामान्यांसाठी सुविधा निर्माण झाल्यास निवडणुकीत त्याचा लाभ होईल, असा सल्लाही त्यांनी दिला. सिंहस्थासाठी राज्य शासनाकडून महापालिकेला निधी त्वरित उपलब्ध करून द्यावा या महापौरांनी केलेल्या मागणीचा धागा पकडून तो लवकरच देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. परंतु, या निधीतून शहरात चांगल्या दर्जाची विकास कामे करावीत अशी सूचना केली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या गरिबांसाठीच्या योजनांची लांबलचक यादी मांडली. ग्रामीण भागातील नव्हे तर, शहरातील गरीबांना स्वत:चे घर असावे म्हणून केंद्राने जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान योजना सुरू केली आहे. याकरिता केंद्र व राज्य शासन निधी देण्यास तयार असताना तो घेण्यात पालिकेने कमी पडू नये, असे कान त्यांनी टोचले. केंद्र व राज्याच्या योजनेत पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी सक्रियपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले. महापौर वाघ यांनी शहरातील विकास कामात पक्षीय राजकारण न आणता काम केले जात असल्याचे स्पष्ट केले. शासनाने सिंहस्थासाठी निधी देण्याची आतापर्यंत बरीच आश्वासने दिली आहेत. सिंहस्थासाठी अतिशय कमी कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे तो निधी लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले. सर्व प्रमुख मान्यवरांकडून घरकुल योजनेचे गोडवे गाण्यात आले. राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा नगरसेविका सुनिता निमसे यांनी लाभार्थीना घराचे वाटप झाले असले तरी उर्वरित घरे लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. दरम्यान, ज्या घरकुल योजनेचे वाजतगाजत लोकार्पण करण्यात आले, त्यातील निम्म्याहून अधिक घरांचे काम अर्धवट आहे. केवळ २५ ते ३० टक्के घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. असे असताना लोकार्पणाचा घाट घालण्यामागे निवडणुकीचे राजकारण असल्याचे स्पष्ट झाले आहे.