शहरात मुबलक पाणी पुरवठा असताना विविध भागात टँकरची संख्या का वाढली? असा प्रश्न उपस्थित करून ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍सच्या पाणी वितरण आणि टँकर व्यवस्थेत मोठा घोळ असल्याचा आरोप सत्ता पक्ष नेते प्रवीण दटके यांनी करून  या संदर्भात चौकशीची मागणी केली. याबाबतचे एक निवेदन त्यांनी आयुक्तांना सादर केले.
महापालिकेने ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍ससोबत करार केला होता, त्यावेळी नेटवर्किंग आणि नॉननेटवर्किंग असे दोन भाग केले होते.
गेल्या वर्षी कन्हानमध्ये ६० ते ७० एमएलटी पाणी वाढले. नॉन नटवर्किंग भागात पाईप लाईन दुरुस्त करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
शहरातील बहुतेक पाण्याच्या टाक्यांमध्ये मुबलक पाणी पुरवठा असताना शहरातील विविध भागात अपेक्षेपेक्षा टँकरची संख्या वाढली कशी? असा प्रश्न उपस्थित करून यामध्ये मोठा घोळ असून आयुक्तांनी त्याची चौकशी केली               पाहिजे.
नॉन नेटवर्किंग भागात गरज नसताना टँकरच्या फेऱ्या वाढल्या असून एवढे पाणी जाते कुठे? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
या प्रकरणाची आयुक्तांनी आणि गरज पडल्यास पोलिसांमार्फत चौकशी करावी, मुबलक पाणी पुरवठा असताना शहरात पाण्याची समस्या निर्माण होण्याचे कारण नाही.
गेल्या वर्षी टँकरचालकाला प्रत्येक भागात जाण्यासाठी एक पावती दिली जायची, यावर्षी मात्र एकाचवेळी १० पावत्या देऊन पाणी वाटप करण्याचे आदेश टँकरचालकांना देण्यात आले आणि यात मोठा घोळ आहे.
उत्तर, पूर्व आणि दक्षिण नागपुरातील पाण्याच्या टाक्यांतील पाण्याची पातळी वाढलेली असताना नॉन नेटवर्किंग भागात पाण्याची टंचाई निर्माण झाली कशी? याची चौकशी केली पाहिजे, असेही दटके म्हणाले.
अनेक ठिकाणचे फ्लो मीटर गायब झाले आहेत. महापालिका प्रशासनाने याची चौकशी करावी आणि दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी दटके यांनी केली.