चिरनेर येथे नुकत्याच पुरुष व महिलांच्या मॅटवरील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुरुष गटात पेणच्या गणेश शिर्की या संघाने तर महिला गटात अलिबागच्या दिलखूश आवास या संघाने बाजी मारली आहे. उरण तालुक्यात पहिल्यांदाच मॅटवर स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या.
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या तसेच पीपी खारपाटील व शेकाप यांनी कबड्डी स्पर्धाचे आयोजन केले होते. पुरुष गटातील अंतिम सामना हा पेण तालुक्यातील गणेश शिर्की व उरणच्या गणेश क्लब यांच्यात खेळला गेला. चुरशीच्या सामन्यात शिर्की संघ विजयी झाला. महिला गटात काळभैरव ठाकूर वाडी पेण व अलिबाग येथील दिलखूश आवास या दोन संघात खेळला गेला. या सामन्यात दिलखूश आवास हा संघ विजयी ठरला. पुरुष गटात सवरेत्कृष्ट चढाईचे बक्षीस गणेश क्लब बोकडवीराच्या पंकज म्हात्रे याला देण्यात आला. महिला गटात काळभैरव ठाकूरबेडीच्या खेळाडू प्रगती भुसळे यांना देण्यात आला. या वेळी पीपी खारपाटील, राजेंद्र खारपाटील, सुरेश पाटील, जीवन गावंड व रायगड जिल्हा कबड्डी संघाचे उपाध्यक्ष सूर्यकांत ठाकूर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.