कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमात लवकरच १८५ बसेस दाखल होणार आहेत. यासंबंधीच्या सविस्तर प्रकल्प अहवालास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.  
कल्याण डोंबिवली महापालिकेचा परिवहन उपक्रम तोटय़ात आहे. नव्याने विकत घेतलेल्या बसेस बंद पडण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. या पाश्र्वभूमीवर उपक्रमाने मध्यंतरी नव्या बसेस खरेदीचा सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्र सरकारकडे पाठविला होता. सर्वसाधारण सभेतही या प्रस्तावास हिरवा कंदील दाखविण्यात आला होता. या नव्या बस खरेदीच्या सविस्तर प्रकल्पास केंद्र सरकारने मंजुरी दिल्याने बस खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंबंधी लागणाऱ्या कर्ज उभारणीस हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. १८५ बस उपक्रमात दाखल झाल्यानंतर त्या ‘सार्वजनिक खासगी भागीदारीतून’ (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) चालवण्यात येतील.
या बसमध्ये वाहक उपक्रमाचा असेल, तर चालक व तंत्रज्ञ हे खासगी ठेकेदाराचे असतील. या सेवेसाठी दहा वर्षांचा करार करून त्यांना योग्य जागी जागा उपलब्ध करून देण्यात येईल. ठेकेदाराने हलगर्जीपणा केल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे सुधीर राऊत यांनी सांगितले.