शिक्षणातील लातूर पॅटर्न सर्वदूर पोहोचला. धार्मिक सलोखा पाळण्यातही लातूरने नाव कमावले. प्लॅस्टिकमुक्तीसाठी लातूरकर नव्याने एकत्र आले व त्यांनी वेगळा आदर्श निर्माण केला. सांघिक भावनेतून काम करून लातूरचा नावलौकिक वाढवूया, असे आवाहन आमदार दिलीपराव देशमुख यांनी केले.
प्लॅस्टिकमुक्तीसाठी कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, व्यापारी संघटना, गणेश मंडळांचे पदाधिकारी यांचा दक्ष नागरिक लातूरकर यांच्या वतीने दयानंद सभागृहात आमदार देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. आमदार वैजनाथ िशदे, अॅड. मनोहरराव गोमारे, महापौर स्मिता खानापुरे, शिवसेना जिल्हाप्रमुख पप्पू कुलकर्णी, अतुल ठोंबरे, औसा न. प. मुख्याधिकारी रामदास कोकरे व उपविभागीय पोलीस अधिकारी तिरुपती काकडे उपस्थित होते. ग्रीन फाऊंडेशन, नारी प्रबोधन मंच, आर्ट ऑफ लिव्हिंग, मानिनी महिला मंडळ, रोटरी क्लब, रजनीगंध फाऊंडेशन, हरित पर्यावरण मंच, जिल्हा वकील मंडळ, जानाई प्रतिष्ठान, सराफ सुवर्णकार असोसिएशन, भुसार असोसिएशन, कापड असोसिएशन, रयतू बाजार, पानशॉप विक्रेते यांच्यासह अमर गणेश मंडळ, वंदे मातरम् गणेश मंडळ, साई गणेश मंडळ, महाराजा गणपती, महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट आदींचा सत्कार करण्यात आला.