नागपुरात रविवारपासून आयोजित ‘कृषी वसंत’ या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनावर शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कृषी प्रदर्शनात शेतकरी हिताचे तंत्रज्ञान नाही. निवडणुका जवळ येत असल्याने शेतक ऱ्यांना आपल्याकडे वळविण्यासाठी हे संधान आहे. हे प्रदर्शन एक निवडणूक स्टंट आहे. अशा प्रतिक्रिया शेतकरी नेत्यांनी व्यक्त केल्या.
भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी नागपुरात गेल्या डिसेंबरच्या अखेरीस अॅग्रो व्हिजन हे राष्ट्रीय पातळीवर कृषी प्रदर्शन आयोजित केले. यापूर्वीही त्यांनी राष्ट्रीय कृषी प्रदर्शन घेतले. त्यांच्या प्रदर्शनांना मात करण्यासाठी कृषी वसंत प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन म्हणजे निवडणूक स्टंट आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते अरुण केदार यांनी व्यक्त केली.
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बुडत आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. गहू कापणीसाठी शेतक ऱ्यांजवळ पैसे नाहीत. या वर्षीच्या हंगामात सोयाबीन हातचे गेले. कापसाचे उत्पादन हाती आले, पण भाव नाही. शेतकरी अडचणीत असताना प्रदर्शनासाठी कोटय़वधी रुपये खर्च केले जात आहेत. या प्रदर्शनाचा केवळ सधन शेतकऱ्यांनाच लाभ होणार आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील शेतक ऱ्यांना अशा प्रदर्शनाचा खरच काही लाभ होणार आहे काय? असा प्रश्नही केदार यांनी उपस्थित केला.
‘कृषी वसंत’ प्रदर्शनात आधुनिक तंत्रज्ञान दाखवून काहीही साध्य होणार नाही. जैविक पद्धतीने शेती करण्यासाठी आता गुरांची संख्या पुरेशी राहिली नाही. शेणखत मिळणे दुरापास्त झाले आहे. कृषी उत्पादन वाढण्यासाठी रासायनिक खतांचा वारेमाप वापर झाल्याने आता त्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव आणि शेतकऱ्यांच्या मूलभूत गरजा व मागण्यांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे केदार म्हणाले. देशाचे कृषी मंत्री शरद पवार यांच्या पुढाकाराने होत असलेले हे प्रदर्शन निव्वळ एक सोंग आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी विधवांच्या हक्कासाठी लढणारे विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी व्यक्त केली. या प्रदर्शनाच्या निमित्ताने सरकार ४५ कोटींची उधळपट्टी करीत आहे. याला विदर्भातील शेतकरी विधवांनी विरोध केला आहे. हे प्रदर्शन रद्द करून हा निधी विधवांच्या कल्याण निधीला द्यावा, अन्यथा पांजरी येथील राष्ट्रीय कापूस संशोधन केंद्रासमोर शेतकरी विधवा उपोषण सत्याग्रह सुरू करतील, असा इशाराही तिवारी यांनी दिला आहे.
कृषी साहित्य निर्मात्यांची चांदी -अशोक भुतडा
यवतमाळ- या प्रदर्शनामुळे शेतक ऱ्यांचा कोणताही फायदा होणार नाही. त्यांच्या जीवनात कोणताही ‘वसंत’ बहरणार नाही. त्यांना ग्रीष्माचे चटके सहन करणे भाग आहे. कारण, या प्रदर्शनामुळे कृषी साहित्य निर्मात्यांची चांदी होणार आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ शेतकरी नेते अशोक भुतडा यांनी व्यक्त केली आहे. या प्रदर्शनातून पुन्हा एकदा सरकारचे शेतकरीविरोधी आणि भांडवलदार व उद्योजकांचे हित धोरण स्पष्ट झाले आहे. अशा प्रदर्शनातून उत्पादन वाढवण्याचा संदेश आणि सल्ला शेतक ऱ्यांना दिला जातो. या संदर्भात नवनव्या तंत्रज्ञानाची माहिती त्यांना दिली जाते. मात्र, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळतील, अशी कोणतीच व्यवस्था किंवा यंत्रणा नसते. त्यामुळे उत्पादन वाढले तरी शेतकऱ्यांचे हाल होणारच आणि आत्महत्याही थांबणार नाही. कापसाचा उत्पादन खर्च प्रतिएकर ४० हजार रुपये येतो तेव्हा कुठे ७-८ क्विंटल कापूस पिकतो आणि कापसाला भाव फक्त ४ हजार रुपये दिला जातो. सरकारने कापसाला फक्त १०० रुपये भाववाढ दिली आहे. अशा स्थितीत शेतक ऱ्यांचे शोषण अटळ झाले आहे. सोयाबीन उत्पादनाचा खर्च एकरी साडेसतरा हजार रुपये आणि भाव मात्र २५६० रुपये आहे. यंदा सोयाबीनने तर शेतक ऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. ट्रॅक्टर विकणाऱ्या डिलरला १ लाख १० हजार रुपये एका ट्रॅक्टरवर कमिशन मिळते, पण शेतकऱ्याला दरात सवलत मिळत नाही. खते, बी-बियाणे, कीटकनाशके यांचे भाव गगनाला भिडले आहे. अशा स्थितीत राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचा शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
प्रदर्शनातील तंत्रज्ञानाचाही ‘बीटी’च होईल का -सरोज काशिकर
वर्धा- या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात नव्या तंत्रज्ञानाचा पुरस्कार असल्याचा दावा केला जात आहे, पण शेतीविषयक नव्या तंत्रज्ञानावर दहा वर्ष बंदी करण्याचे धोरण केंद्राने पुढे ठेवले आहे. हा विरोधाभास का? केंद्राच्या बंदीविरुध्द शेतकरी संघटनेने निदर्शने केली. दिल्लीत जाऊन निवेदनेही दिली. या प्रदर्शनीचे स्वागतच आहे, पण त्यातून मिळणारे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचण्याची व्यवस्थाही व्हावी. देशांतर्गत उद्योजकांना उत्पादनाची संधी मिळावी. एकीकडे बी.टी. या नव्या वाणाबाबत अप्रचार केला गेला. त्याचा फोयदा शेतकऱ्यांपर्यत पोहोचण्यास अडथळे निर्माण केले गेले. प्रदर्शनातील तंत्रज्ञानाबाबत असेच होणार काय. असा सवाल शेतकरी संघटनेच्या नेत्या सरोज काशिकर यांनी केला.
नवीन तंत्रज्ञानाची माहिती होईल -अरविंद नळकांडे
अमरावती- या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनातून नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख शेतकऱ्यांना होऊ शकेल. विदर्भातील शेती विकासाच्या दृष्टीने आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, असे मत शेतीतज्ज्ञ अरविंद नळकांडे यांनी व्यक्त केले. कृषी प्रदर्शनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीकाम, पणन आणि व्यवस्थापनाशी संबंधित माहिती मिळते, पण योग्य पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्या, तर या साधनांचा उपयोग करणेही कठीण होते. त्यामुळे सरकारने शेतीविषयक धोरण राबवताना पायाभूत सुविधा पुरवण्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. शेतकऱ्यांपर्यंत जगभरातील शेतीतंत्रज्ञानाची माहिती या कृषी प्रदर्शनातून पोहोचेल, त्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना घेता आला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
आधुनिकतेची कास महत्त्वाची -जगदीश बोंडे
आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून देश-विदेशातील नवीन तंत्रज्ञान आणि कृषी विषयक साधने, पणन व्यवस्थेतील नवीन बाबी शिकायला मिळतील. विदर्भातील शेतकऱ्यांना जवळच हे सर्व पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे, हे महत्वाचे. आधुनिक साधनांचा उपयोग करून शेतीविकास साधला गेला नसता, तर देशातील अन्नधान्याची गरज शेतकरी पूर्ण करूच शकले नसते. शेतकऱ्यांपर्यंत हे नवीन तंत्रज्ञान पोहोचणे अत्यंत महत्वाचे आहे, पण या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर अधिक प्रमाणात कशा पद्धतीने होईल, याकडे सरकारने लक्ष पुरवायला हवे, असे मत शेतकरी संघटनेचे नेते जगदीश बोंडे यांनी व्यक्त केले.