महिला विविध क्षेत्रांत मोठय़ा संख्येने पुढे येत आहेत. विविध विभागांशी निगडित महिलांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या तक्रारींची त्वरित दखल घेण्याचे निर्देश अतिरिक्त जिल्हाधिकारी किसनराव लवांडे यांनी दिले.
महिलांच्या तक्रारी तातडीने निकाली निघाव्यात, म्हणून दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय स्वतंत्र महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम, पोलीस आयुक्त व अधीक्षक कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. समस्याग्रस्त महिलांना त्यांचे प्रश्न सोडविण्यास स्वतंत्र व्यासपीठ मिळावे, म्हणून महिलांसाठी स्वतंत्र लोकशाही दिन सुरू करण्याचा निर्णय महिला व बालकल्याण विभागामार्फत घेण्यात आला. महिला लोकशाही दिनात न्यायप्रविष्ट प्रकरण, सेवाविषयक आस्थापनाविषयक बाबी या तक्रारी स्वीकारल्या जाणार नाहीत.
तालुका स्तरावर चौथ्या सोमवारी (अध्यक्ष, तहसीलदार), जिल्हा स्तरावर तिसऱ्या सोमवारी (अध्यक्ष, जिल्हाधिकारी), विभागीय स्तरावर दुसऱ्या सोमवारी (अध्यक्ष, विभागीय आयुक्त), तर राज्यस्तरावर दुसरा सोमवार (अध्यक्ष, महिला व बालकल्याण मंत्री) असे महिला लोकशाही दिनाचे स्वरूप आहे. तहसीलदारांपासून सुरू होणाऱ्या लोकशाही दिनातील तक्रारी निकाली निघाल्या नाहीत तर सर्वात शेवटी महिला व बालकल्याणमंत्रीच त्यावर अंतिम सुनावणी घेतील. महिलांना एक महिन्यात तक्रारीवर काय कारवाई झाली, याची माहिती देणे संबंधित विभागाला अनिवार्य करण्यात आले आहे.