महाविद्यालयीन युवतींनी आपला सर्वागीण विकास साध्य करण्यासाठी स्वत:ला प्रथम ओळखले पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. श्रद्धा अवस्थी यांनी केले.
महात्मा बसवेश्वर महाविद्यायातर्फे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार होते. प्रा. बी. एम. गोडबोले, प्रा. वनिता पाटील, प्रा. उमा कडगे, प्रा. कल्पना गिराम, प्रा. शालिनी कांबळे उपस्थित होते. युवतींनी भिडस्तपणा व मर्यादा यातील सीमारेषा ओळखून जीवन जगायला शिकले पाहिजे. महाविद्यालयीन जीवनापासूनच आपले ध्येय निश्चित करून ध्येयापासून कधीही विचलित न होता, साध्य साधले पाहिजे. युवतींनी आधुनिक तंत्रज्ञानाचा मर्यादित वापर करावा. टीव्ही, मोबाइल याचा अतिरेकी वापर करू नये, असे डॉ. अवस्थी म्हणाल्या. प्रा. जी. एम. धाराशिवे, प्राचार्य डॉ. कुंभार यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन प्रा. के. एम. गोडबोले यांनी केले. रत्नाकर बेडगे यांनी आभार मानले. कार्यक्रमास तरुणी मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.