पालकांनी आपल्या मुला-मुलींना दिल्या जाणाऱ्या पॉकीटमनीचे ते काय करतात, इकडे सातत्याने लक्ष दिले पाहिजे. स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराकडे बघ्याच्या भूमिकेने पाहण्याची वृत्ती महिलांनी सोडून दिली पाहिजे. आपल्या शांत राहण्याची किंमत जर अशी भयानक असेल तर आता शांत बसने महिलांनी सोडून दिले पाहिजे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्यां रजिया सुलताना यांनी येथे केले. चेतना रॅलीच्या समारोप प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या.
दिल्ली येथील महाविद्यालयीन तरुणीवर चालत्या बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी आणि महिलांवरील वाढत्या अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना व यवतमाळ शहरात महिलांच्या मदतीसाठी हेल्पलाईन तयार करण्यासाठी येथे आयोजित ‘चेतना रॅलीला‘ प्रचंड प्रतिसाद मिळाला. स्त्री अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने आयोजित या रॅलीची सुरुवात पोस्टल ग्राउंडवरून झाली आणि शहरातील मुख्य रस्ते आणि बाजारओळीतून फिरत या रॅलीचा समारोप पोस्टल ग्राउंड येथेच करण्यात आला. या रॅलीत खासदार भावना गवळी, राजलक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष अरिवद तायडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन पखाले, सचिव राजकुमार भितकर, सामाजिक कार्यकत्रे दत्ता कुळकर्णी, अनिल हमदापुरे, अमोल ढोणे, राजेंद्र गायकवाड, यांच्यासह जेष्ठ नागरिक संघ, कामगार संघटना, सेवानिवृत्त अभियंता मंडळ, सिनेरसिक मंडळ, पत्रकार व विद्यार्थ्यांच्या विविध संघटना व विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर हजर होते.
रॅलीत सहभागी झालेल्या मुला-मुलींची संख्या सुध्दा इतकी मोठी होती की, जवळपास एक किलो मीटपर्यंतची लांबी रॅलीने गाठली होती.           
महिलांच्या संरक्षणासाठी समिती
महिला अत्याचार विरोधी संघटनेचा उद्देश प्रामुख्याने महिलांना संरक्षण प्रदान करणे हा असून संघटनेचे कार्य निरंतन चालणारे आहे. संघटनेत ५० लोकांची एक समिती स्थापन करण्यात येऊन ती जनतेच्या संपर्कात २४ तास असेल, अशी माहिती समितीचे निमंत्रक अरिवद तायडे यांनी यावेळी दिली. आत्मरक्षणसाठी तरुणींना एका विशेष प्रकारचे प्रशिक्षण देण्याचीही योजना समितीने आखली असल्याचीही तायडे यांनी सांगितले. केवळ काही दिवसांसाठीच काम करणारी संघटना, अशी संघटनेची भूमिका राहणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.