बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला तुर, मुग, उडीद, सोयाबीन, चना, ज्वारी, मका व गहू हा शेतीमाल एकाचवेळी बाजार आवारात विक्रीस आल्यामुळे बाजारभाव कमी होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते म्हणून लासलगाव बाजार समितीतर्फे सन २०१४-१५ या हंगामाकरिता शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय सदस्य मंडळाने घेतला असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती नानासाहेब पाटील यांनी दिली.
सन १९९०-९१ पासून पणन मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या शेतमाल तारण कर्ज योजनेत बाजार समिती दरवर्षी सहबागी होऊन सदर योजनेचा कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा करून देते. मात्र सन २०१३-१४ पासून पणन मंडळ सदरची योजना खासगी एजन्सीमार्फत राबवित असल्याने सदर एजन्सीच्या अटी,व्याजदर व अनुषंगिक खर्च उत्पादकांना परवडणारा नसल्याने बाजार समितीच्या सदस्य मंडळाने शेतकरी हित विचारात घेऊन सन २०१४-१५ या हंगामाकरिता तुर, मुग, उडीद, सोयाबीन, चना, ज्वारी, मका व गहू या शेतीमालासाठी पणन मंडळाच्या अटी व शर्तीनुसार शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सदर योजनेत फक्त उत्पादक शेतकऱ्यांचाच माल तारणात ठेवला जाणार असून बाजार समितीचे प्रतवारीकार यांनी शिफारस केलेला तुर, मुग, उडीद, सोयाबीन,चना, ज्वारी, मका व गहू हा शेतीमाल ज्या दिवशी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात तारण म्हणून ठेवला जाईल. त्या दिवसाचे बाजारभाव विचारात घेऊन बाजार समिती वखार महामंडळाचे पावतीप्रमामे स्वनिधीतून संबंधित शेतकऱ्यास धनादेशाद्वारे रक्कम अदा करणार आहे.
संबंधित शेतकऱ्यांचा खाते उतारा व सात-बारा उताऱ्यावरील तूर, मूग, उडीद, सोयाबीन, चना, मका व गहू या शेतीमालासाठी किंमतीच्या ५० टक्के अथवा जास्तीत जास्त ५०० रुपये प्रती क्विंटल यापैकी कमी असणारी तर तुर, मुग, उडीद, सोयाबीन व चना या शेतीमालासाठी किंमतीच्या ७५ टक्के रक्कम तारण कर्ज म्हणून सहा महिन्याचे मुदतने नऊ टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना अदा करण्यात येणार आहे. तरी कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी सदर योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन सभापती पाटील, उपसभापती इंदुबाई तासकर व सचिव बी. वाय. होळकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९०२१९५३८६९, ९९२२६३१२४१ क्रमांकावर संपर्क साधावा.