स्थानिक संस्थाकर (एलबीटी) विरोधात फेडरेशन असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने राज्यातील २३ महापालिकेच्या हद्दीत १५ व १६ जुलै रोजी बंदची हाक दिली होती. पहिल्या दिवशी लातूर महापालिका कार्यक्षेत्रात बंदला व्यापाऱ्यांनी १०० टक्के प्रतिसाद दिला.
गेल्या वर्षभरापासून एलबीटीची तिढा अजून सुटलेला नाही. व्यापाऱ्यांबरोबर सरकार चच्रेच्या फेऱ्या सुरू असल्या तरी प्रश्न मात्र अद्याप सुटलेला नाही. एलबीटीऐवजी व्हॅटमध्ये सरसकट एक टक्का वाढ करण्याचा पर्याय व्यापाऱ्यांनी सुचविला. मात्र तो सरकारने फेटाळला.
बंदचे नियोजन व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आले. महापालिका हद्दीत एखाद्या गल्लीतील छोटे दुकानही उघडू नये, यासाठीची काळजी घेण्यात आली होती. दोन दिवसांचा बंद हा राजकीय पक्ष अथवा कोणत्या संघटनेने पुकारलेला नसून तो व्यापाऱ्यांनी पुकारलेला आहे. या बंदमध्ये सर्वानी सहभागी होऊन आपली वज्रमूठ दाखवावी, असे आवाहन केल्यामुळे त्याला सर्वानीच चांगला प्रतिसाद दिला. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बसवराज वळसंगे, सचिव दिनेश गिल्डा, विश्वनाथ किणीकर, प्रदीप सोळंकी, प्रदीप सोनवणे आदींनी पहिल्या दिवशी बंदला दिलेल्या प्रतिसादाबद्दल विविध व्यापारी संघटनांचे आभार व्यक्त केले.