दोन हजार पोलीस, ५०० गाडय़ा, रस्त्यांची दुरुस्ती, दुभाजकांना रंगरंगोटी सुरू असून, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उद्यापासून दोन दिवस लातूर जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी लातूर नगरी सजली आहे. दयानंद शिक्षण संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांच्या सांगता समारंभासाठी ते येणार असून या कार्यक्रमास राज्यपाल के. शंकरनारायण, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. राष्ट्रपतींची सुरक्षितता महत्त्वाची असल्याने त्यासाठी सुमारे २ हजार पोलीस लातुरात तैनात करण्यात आले आहेत. विशेष पोलीस अधीक्षक, तीन अप्पर पोलीस अधीक्षक, ११ पोलीस उपाधीक्षक, ३३ पोलीस निरीक्षक, १०३ पोलीस उपनिरीक्षक, ११३३ पोलीस, १४५ महिला पोलीस, ४३ वाहतूक पोलीस व शिवाय तैनातीला ५०० गाडय़ा दाखल झाल्या आहेत.
अग्निशामक दलाचे स्वतंत्र तळच तयार करण्यात आले आहे. क्रीडासंकुलाचा परिसर वाहनांसाठी आरक्षित करण्यात आला आहे. औसा रोड, शिवाजी चौक, बार्शी रस्ता हे राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी चकाचक करण्यात आले आहेत. पाच वर्षांपूर्वी लातूर जिल्हय़ाच्या रौप्यमहोत्सवीवर्षांनिमित्त राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील लातुरात आल्या होत्या. त्यानंतर पाच वर्षांनी नवनिर्वाचित राष्ट्रपती लातुरात येत आहेत. तब्बल पाच वर्षांनी शासकीय विश्रामगृह, राजीव गांधी चौक व विविध रस्त्यांची दुरुस्ती होत आहे. रस्त्याच्या दुभाजकांची रंगरंगोटी, आतील वृक्षांची छाटणी, हॉटमिक्स यंत्रणा वापरून तयार केलेला रस्ता, अतिक्रमण निर्मूलन असे उपक्रम प्रशासनाने हाती घेतले आहेत. औसा रोड व बार्शी रोड हा मार्ग सर्वसामान्यांसाठी ३१ मे व १ जून असे दोन दिवस वापरासाठी बंद करण्यात आला आहे. दोन्ही रस्त्यांवरील व्यापाऱ्यांना आपली दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दयानंद महाविद्यालयाच्या समोरील बाजूस रस्त्यावरच भरणाऱ्या रयत बाजारासही दोन दिवसांची सुटी देण्यात आली. औसा रस्त्यावरील सर्व ढाबामालकांनी सुरक्षा यंत्रणेच्या भीतीने दोन दिवस स्वत:च सुटी घेतली आहे. ३१ मे रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निवासस्थानी भोजन घेऊन शासकीय विश्रामगृहावर मुक्काम करतील. शनिवारी सकाळी नाश्ता झाल्यानंतर ते दयानंद महाविद्यालयाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी प्रयाण करतील. दयानंद महाविद्यालयाच्या परिसरातील क्रीडासंकुलात होणाऱ्या कार्यक्रमासाठी संयोजकांना प्रचंड धावपळ करावी लागत आहे.

खासदार रुसले
मोठय़ा मंडळींचे रुसवेफुगवे व राजशिष्टाचार पाळण्यात संयोजकांची धांदल उडत आहे. खासदार जयवंत आवळे यांना लातूरच्या मोठय़ा कार्यक्रमात व्यासपीठावर बसण्याचा मान मिळणार नाही. कारण दिलेल्या वेळेत त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे लेखी कळविले नसल्यामुळे त्यांचे नाव पत्रिकेत छापता आले नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांनी दयानंद शिक्षण संस्थेच्या विरोधात पत्रकबाजी करून आपला राग व्यक्त केला. त्यामुळे खासदार रुसल्याची चर्चा आहे. शिवराज पाटील चाकूरकरांनी कार्यक्रम नीटनेटका होण्यासाठी लक्ष घातल्यामुळे दयानंदचा कार्यक्रम कमालीचा आखीवरेखीव होणार आहे.