येथील तरुण वकील मनीष पल्लोड यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच मंगळवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. ते ४५ वर्षांचे होते.
मनीष पल्लोड यांचा बुधवारी वाढदिवस होता. त्यापूर्वीच त्यांनी घरातील (सहकार सभागृह रस्ता) पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. मध्यरात्री १च्या सुमारास हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात आला. त्याची माहिती मिळताच त्यांचे अन्य नातेवाईक, मित्रांनी त्यांच्या घरी एकच गर्दी केली. तोपर्यंत पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आत्महत्येची नोंद केली.
शहरातील ज्येष्ठ वकील व व्हिडिओकॉनचे कायदेविषयक सल्लागार एस. बी. पल्लोड यांचे ते चिरंजीव होत. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.
बुधवारी दुपारी अमरधाम स्मशानभूमीत मनीष पल्लोड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही, मात्र किडनीच्या विकाराने ते त्रस्त होते. या आजाराला ते कंटाळले होते असे सांगण्यात येते.