News Flash

डॉ. लहानेंच्या कामासमोर आपण नतमस्तक- पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे

समाजात व्यंग घेऊन जन्माला आलेल्या लोकांची टवाळी केली जाते, त्यांचे जीवन उद्ध्वस्त होते. डॉ. लहाने अशा मंडळींना पुनर्जन्म देण्याचे काम करतात. त्यांचे काम पाहून आपण

| October 28, 2013 01:55 am

समाजात व्यंग घेऊन जन्माला आलेल्या लोकांची टवाळी केली जाते, त्यांचे जीवन उद्ध्वस्त होते. डॉ. लहाने अशा मंडळींना पुनर्जन्म देण्याचे काम करतात. त्यांचे काम पाहून आपण नतमस्तक झालो असल्याचे भावपूर्ण उद्गार पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी काढले.
दिवाणजी मंगल कार्यालयात डॉ. विठ्ठल लहाने यांच्या रुग्णालयाच्या उद्घाटनानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर डॉ. विठ्ठल लहाने यांची आई अंजनाबाई व वडील पुंडलिकराव लहाने, डॉ. विकास आमटे, प्राचार्य अनिरुद्ध जाधव, सचिंद्र प्रतापसिंह, डॉ. रागिणी पारेख, डॉ. विजय पौळ, डॉ. विठ्ठल लहाने, डॉ. तात्याराव लहाने उपस्थित होते.
डॉ. आमटे म्हणाले, आम्हाला बाबा आमटे यांचा वारसा होता. डॉ. लहाने यांचे आई, वडील दोघेही शेतकरी. त्यांनी आपल्या मुलांमध्ये जिद्द कशी निर्माण केली? कुटुंबातील प्रेम कसे टिकवून ठेवले? हे आश्चर्य वाटणारे आहे. डॉ. विठ्ठल लहाने यांनी आपल्या कामातून जगात नाव कमावले आहे. डॉक्टरी पेशा हा दिवसेंदिवस बदनाम होतो आहे. या स्थितीत डॉ. विठ्ठल लहाने व तात्याराव लहाने यांनी आपल्या कामातून या पेशाबद्दल लोकांमध्ये आदरभाव निर्माण केला आहे. डॉ. तात्याराव लहाने हे बाबा आमटेंच्या काळापासून आनंदवनात येतात. त्यांचे, आमचे कौटुंबिक संबंध आहेत. पशाचे समाधान हे जीवनात तात्पुरते असते. आत्मिक समाधान मिळवण्यासाठी सामाजिक कामच केले पाहिजे. समाजातील लोकांमध्ये प्रेरणा निर्माण करण्याचे काम बाबा आमटे यांनी केले. त्याचा वारसा आपण आनंदवनात चालवत असल्याचे ते म्हणाले.
आदिवासी भागातील लोक तंत्र, मंत्र, गंडे, दोरे याच्यावर विश्वास ठेवायचे. लोक त्यांना अंधश्रद्ध म्हणून हिणवत असत. वास्तविक ती त्यांची श्रद्धा होती. त्यांच्यासमोर आम्ही पर्याय दिला व त्या पर्यायातून त्यांची अंधश्रद्धा दूर केली. डॉ. विकास आमटे यांनी देवाच्या नजरचुकीने एखाद्यास शारीरिक व्यंग राहून गेले असेल तर ते दूर करण्याचे काम डॉ. लहाने करतात हे एका अर्थाने ते देवाचेच काम करतात, असे सांगितले.
परभणीचे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतापसिंह यांनी लहाने यांचे रुग्णालय हे खासगी रुग्णालय असे आपण समजत नाही तर ते सार्वजनिक रुग्णालय आहे, या भावनेतूनच आपण कार्यक्रमास आलो असल्याचे सांगितले. प्राचार्य अनिरुद्ध जाधव यांनी काही वेळा विद्यार्थ्यांमुळे गुरुजींची ओळख समाजात चांगल्या पद्धतीने होते याचा आनंद आपण आज घेत असल्याचे सांगितले. माणुसकीचा आदर्श माणसाला मोठा करतो. हे भान ठेवून आम्ही काम करत असल्याचे डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. डॉ. विठ्ठल लहाने यांनी प्रास्ताविक केले. आनंदवनातील कुष्ठरोगतज्ज्ञ डॉ. विजय पौळ व मुंबई येथील जे जे रुग्णालयातील नेत्रविभागप्रमुख डॉ. रागिणी पारेख यांची समयोचित भाषणे झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2013 1:55 am

Web Title: lean in front of dr lahane work dr prakash amte
टॅग : Dr Prakash Amte,Latur
Next Stories
1 जिल्हाधिकारी केंद्रेकरांमुळे यंदा सर्वसामान्यांची दिवाळी गोड
2 आमदार पोकर्णाच्या दमदाटीने पोलीस दलात अस्वस्थता
3 आमदार सातव यांच्या प्रयत्नांमुळे हिंगोलीकरांसाठी रेल्वे सुरू
Just Now!
X