News Flash

कठडे असलेल्या विहिरीत पडून बिबटय़ाचा मृत्यू

कठडे नसलेल्या विहिरीत वन्यप्राणी पडून मृत्यू पावल्याच्या अनेक घटना आजपर्यंत ऐकिवात आहेत, पण कठडे असूनही विहिरीत पडून बिबटय़ाचा

| February 14, 2015 01:52 am

कठडे नसलेल्या विहिरीत वन्यप्राणी पडून मृत्यू पावल्याच्या अनेक घटना आजपर्यंत ऐकिवात आहेत, पण कठडे असूनही विहिरीत पडून बिबटय़ाचा मृत्यू झाल्याची घटना सर्वानाच बुचकाळयात टाकणारी आहे. आज, शुक्रवारी सकाळी चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली वनपरिक्षेत्राजवळच्या शेतात ही घटना उघडकीस आली.
चिचपल्ली वनपरिक्षेत्राजवळ एका गावकऱ्याच्या शेतातल्या विहिरीत एक ते सव्वा वर्षांचे मादी बिबट पडले. विहिरीच्या दुसऱ्या बाजूला आश्रमशाळा आहे. सकाळी खेळता खेळता विद्यार्थ्यांना या ठिकाणी काहीतरी सडल्याचा वास आला. विद्यार्थ्यांनी जवळच्याच विहिरीत डोकावून पाहिल्यानंतर पूर्णपणे सडलेल्या अवस्थेतील बिबटय़ाचा मृतदेह त्यांना दिसून आला. आश्रमशाळेच्या संचालकांनी ही माहिती वनखात्याला दिली. चिचपल्ली, बल्लारशाचे वनपरिक्षेत्र अधिकारी घटनास्थळी आले. विहिरीला कठडे असतानाही बिबट पाण्यात पडल्याने सर्वानाच आश्चर्य वाटले. या ठिकाणी पाहणी केली असताना अस्वलाच्या खाणाखुणा आणि विष्ठा आढळून आली. त्यामुळे बिबटय़ाच्या पिलावर अस्वलांनी आक्रमण केले असावे आणि बचावाच्या प्रयत्नात बिबट विहिरीत पडला असावा, अशी प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात आली. विहिरीत जवळपास अडीच फूट पाणी होते आणि बिबट अगदी लहान असल्याने गुदमरून त्याचा मृत्यू झाला असावा. मोठा बिबट असता तर कदाचित बचावला असता, अशीही शक्यता यावेळी व्यक्त करण्यात आली. मृत मादी बिबटय़ाचे पिलू पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत होते. त्याची नखेसुद्धा झिजलेली होती. त्यामुळे हा मृत्यू चार-पाच दिवसांपूर्वीच झाला असावा, असा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला. शवविच्छेदनाकरिता पशुवैद्यक डॉ. रविकांत खोब्रागडे यांना बोलावण्यात आले, पण बिबटय़ाचा मृतदेह शवविच्छेदन करण्याच्या स्थितीतही नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2015 1:52 am

Web Title: leopard dies after falling into well
टॅग : Leopard
Next Stories
1 महापालिकेची स्वयंचलित अग्निसुरक्षा कागदावरच
2 विदर्भात स्थलांतरित पक्ष्यांची सर्रासपणे शिकार
3 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्त्या आता नवीन कुलगुरूंच्या काळात
Just Now!
X