गेल्या तीन वर्षांत गोंदिया नगरपालिका प्रशासनाने शहरातील रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी शासनाच्या विविध योजनांतर्गत तब्बल साडेआठ कोटी उधळले. मात्र, रस्त्यांची अवकळा कायमच असल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पालिकेने खर्च नेमका कुठे केला, याबाबत वरिष्ठ स्तरावर चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
रस्ते शहराच्या विकासाचे द्योतक मानले जाते. रस्त्यांवरूनच शहराच्या विकासाची कल्पना येते; परंतु गोंदिया शहरातील रस्त्यांची अवस्था बघून येथे येणाऱ्या प्रत्येकाला शहराविषयी आकस निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. आज शहरातील रस्ते दळणवळणासाठी योग्य नसल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. मागील तीन वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास गोंदिया पालिकेकडून शासनाच्या विविध योजनेंतर्गत रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी ८ कोटी ५२ लाख ९ हजार ५८३ रुपयांचा खर्च करण्यात आला. यात २०१०-११ या आर्थिक वर्षांत रस्ता अनुदानांतर्गत १ कोटी ८६ लाख ४५ हजार ३१६ रुपये, दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत ८५ लाख ७९ हजार २५७ रुपये, तर वैशिष्टय़पूर्ण योजनेंतर्गत ९४ लाख ७ हजार ८८५रुपये, असे एकूण ३ कोटी ६६ लाख ३१ हजार ४५८ रुपये खर्च करण्यात आले. २०११-१२ या आर्थिक वर्षांत रस्ता अनुदान योजनेंतर्गत २ कोटी ५३ लाख ७० हजार ३१० रुपये, दलितवस्ती योजनेंतर्गत ४९ लाख ५ हजार ११९ रुपये, तर वैशिष्टय़पूर्ण योजनेंतर्गत १३ लाख ११ हजार ७३ रुपये, असे एकूण ३ कोटी १५ लाख ५८० रुपये खर्च करण्यात आले आहे. २०१२-१३ या आर्थिक वर्षांत रस्ता अनुदान योजनेंतर्गत ३८ लाख ८५ हजार ९३८, तर दलितवस्ती योजनेंतर्गत १ कोटी ३१ लाख ४ हजार ६८५, असे एकूण १ कोटी ६९ लाख ९० हजार ६२३ रुपयांचा खर्च करण्यात आला; परंतु आजही शहरातील रस्त्यांची अवस्था बघता हा खर्च केवळ कागदोपत्री झाला असल्याचा मुद्याला बळ मिळते.
रस्त्यांच्या दुर्दशेमुळे शहरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून याचा भरुदड नागरिकांनाच वाहनांवर होणाऱ्या अतिरिक्त खर्चाच्या माध्यमातून सोसावा लागत आहे. त्यामुळे या खर्चाच्या चौकशीची मागणी शहरातील नागरिकांकडून केली जात आहे.
गेल्या तीन वर्षांत साडेआठ कोटी रुपये शहरातील रस्त्यांवर खर्च झाले असल्याची आकडेवारी पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तीन वर्षांत गोंदिया पालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीची सत्ता राहिली आहे. त्यामुळे रस्त्यांच्या या दुर्दशेला जबाबदार ही सत्ताधारी आघाडी असल्याचेही बोलले जात आहे. किंवा दुसरी बाजू पालिका प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका रस्त्याच्या दूरवस्थेला कारणीभूत असल्याचे समजते.

भ्रष्टाचारामुळेच दर्जाहीन कार्य – अग्रवाल
गोंदिया शहरातील रस्ते दुरुस्ती व नूतनीकरणसंदर्भात पालिकेने साडेआठ कोटी रुपयांचा खर्च केला असला तरी रस्त्यांची अवस्था भकास झालेली आहे. आज पालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे, परंतु सत्ताधारी विकासकामांपेक्षा मलिद्याकडे अधिक लक्ष देत असल्याने शहरातील विकास खुंटला आहे. तीन वर्षांत कोटय़वधीचा निधी येऊनही रस्त्यांची दूरवस्था झाल्याचे मूळ कारण म्हणजे आलेल्या निधीत प्रचंड भ्रष्टाचार झाला असून त्यामुळेच दर्जाहीन कार्य झाल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केला आहे.