विदर्भात विविध राजकीय पक्षांतर्फे सदस्य नोंदणी मोहीम राबविली जात असली तरी एकाही राजकीय पक्षाला मात्र त्यात फारसा प्रतिसाद मिळलेला नाही. गेल्या काही दिवसांत सदस्य तयार करण्यावरून राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. येणाऱ्या काळात निवडणुका नसल्यामुळे त्याचा परिणाम या मोहिमेवर झाल्याचे दिसून येत आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांसह अनेक राजकीय पक्षांनी सदस्य मोहीम राबविणे सुरू केले आहे. काही छोटय़ा पक्षांनीही संघटन वाढविण्याच्या दृष्टीने आणि लोकांना पक्षाशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने सदस्य मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांचा सध्या केवळ सदस्य मोहिमेच्या निमित्ताने बैठका आणि कार्यक्रमांवर भर आहे. जास्तीत जास्त लोकांना पक्षाशी जोडण्याच्या दृष्टीने राजकीय पक्षांनी घरोघरी जाणे सुरू केले आहे. मात्र, सदस्य होण्यास सामान्य नागरिक फारसा उत्सुक दिसून येत नाही. सामान्य नागरिकांना पक्षाशी जोडणे हा विविध राजकीय पक्षाचा हेतू असला तरी राज्यात तूर्तास कुठल्याही निवडणुका नसल्यामुळे लोक सदस्य होण्यास तयार नाही आणि कार्यकर्ते सदस्य करण्यास फारसे उत्सुक दिसून येत नाहीत. असे असले तरी विविध राजकीय पक्षांनी कार्यकर्त्यांंना सदस्य मोहिमेचे लक्ष्य दिले असल्यामुळे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करीत आहे.
या सदस्य मोहिमेसाठी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकत्यार्ंना सदस्य तयार करण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. त्यामुळे कसेही करून पक्षाने दिलेला आकडय़ापर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्ते घरोघरी आणि चौकाचौकात सदस्य तयार करण्यासाठी फिरत असले तरी त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. महापालिकेतील नगरसेवकांना सदस्य तयार करण्याचे पक्षाच्या वरिष्ठ सदस्यांकडून आदेश देण्यात आल्यामुळे त्यांच्याकडे एखादी समस्या घेऊन किंवा कुठल्याही कामासाठी जाणाऱ्याला प्रथम पक्षाचे सदस्यत्व स्वीकारा, त्यानंतर तुमच्या भागातील समस्येचा विचार केला जाईल, असेही सांगितले जात आहे. अनेकांनी ऑनलाईन सदस्य मोहीम सुरू केली आहे त्यामुळे त्यांच्या माध्यमातून सदस्य होत आहे. भाजपतर्फे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देशभर सदस्य मोहीम राबविण्यासाठी आवाहन केल्यानंतर विदर्भातील विविध जिल्ह्य़ांत हे अभियान राबविण्यासाठी कार्यकर्त्यांंना आवाहन करण्यात आले. मात्र, पक्षाला फारसे यश मिळाले नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असताना राज्यात केवळ २५ लाखांच्या जवळपास सदस्य झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसतर्फे सदस्य मोहीम राबविली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने १२ डिसेंबरपासून सदस्य मोहिमेला शुभारंभ केला. त्यांना शहर आणि जिल्ह्य़ात फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्य़ात आतापर्यंत ३० ते ४० हजार सदस्य झाले असल्याचे पक्षाचे शहर अध्यक्ष अजय पाटील यांनी सांगितले. काँग्रेसची सदस्य मोहीम सुरू असून त्यांची सुद्धा अशीच परिस्थिती आहे. राज्यात आणि केंद्रात काँग्रेसची सत्ता नसल्यामुळे अनेक लोक सदस्य होण्यास तयार नाही. सदस्य होऊन काय उपयोग? अशी अनेकांची मानसिकता असल्यामुळे नागरिक त्याकडे दुर्लक्ष करू लागले आहे. सदस्य अभियानात नागरिकांचा अनुत्साह असला तरी कार्यकर्त्यांना पक्षाने दिलेले लक्ष्य पूर्ण करायचे असल्यामुळे ते विविध मार्गानी सदस्य तयार करण्याच्या कामात व्यस्त आहे. काँग्रेसप्रमाणे बहुजन समाज पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या पक्षांचीही सदस्य मोहीम सुरू झाली आहे. मात्र, त्यांनाही फारसा प्रतिसाद नसल्याचे दिसून येत आहे.