जुन्या भांडणातून एका तरुणाची दगडाने डोके ठेचून हत्या करण्यात आली. दाभा रिंग रोडवरील ठाकरे लेआऊट परिसरात सोमवारी पहाटे दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी तातडीने शोध घेऊन अवघ्या काही तासातच दोन आरोपींना अटक केली. गेल्या दोन दिवसात खुनाची ही सहावी घटना आहे.
नितीन विश्वनाथ खवसे (रा. साईनगर वाडी) हे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. आज सकाळी दिवस उजाडल्यानंतर ठाकरे लेआऊट परिसरात मृतदेह पडला असल्याचे कुणालातरी दिसले. हत्या झाल्याचे पसरायला वेळ लागला नाही. त्यानंतर तेथे बघ्यांची गर्दी झाली. हे समजल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बोंडे यांच्यासह तेथे गिट्टीखदान पोलिसांचा ताफा पोहोचला. पोलिसांनी मृतदेहाचे निरीक्षण केले. मृत तरुणाचे डोके दगडाने ठेचले होते. डोक्यातून रक्तस्राव सुरू होता नि त्यावर माशा घोंगावत होत्या. हा मृतदेह नितीनचा असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी ओळखले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून लगेचच तपास सुरू केला. पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांची तसेच ओळखणाऱ्यांची विचारपूस केली. नितीन एका कंपनीत वाहन चालक होता. त्याला मद्याचे व्यसन होते. तो रोजच दारू पिऊन घरी आल्यानंतर पत्नीला मारहाण करायचा. त्याच्या अशा वर्तनामुळे घरातील लोक त्रासले होते.
काल रात्री तो काही तरुणांसह दारू प्यायला गेला होता. तेव्हापासून तो बेपत्ता असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरू केली होती. पोलिसांनी काल रात्री तो कुणासोबत दारू प्यायला गेला होता, याचा शोध सुरू केला. आरोपी राहुल श्याम खाडे (रा. शिवाजीनगर दाभा) व निखीत घनश्याम आडे (रा. साईनगर दाभा) यांच्या घरी पोलीस गेले. दोघेही घरात गाढ झोपले होते. पोलिसांनीच त्यांना उठविले. पोलिसांना पाहून त्यांची नशा खाडकन उतरली. काल हे दोघे नितीन व इतरांसह दारू पित बसले होते. दारूच्या नशेत त्यांचे कुठल्याशा बाबीवरून भांडण झााले. भांडणात अश्लील शिव्यांचा यथेच्च वापर झाला. आरोपींनी नितीनला जबर मारहाण करून त्याचे डोके दगडाने ठेचून काढले. दोन वर्षांपूर्वी राहुलशी त्याचे भांडण झाले होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या दोन आरोपींना अटक केली.