मार्ड संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपामुळे रुग्णसेवेवर विपरीत परिणाम होत आहे. या पाश्र्वभूमीवर येथील १०८ डॉक्टरांनी शासकीय सवरेपचार रुग्णालयाच्या आवारात शुक्रवारी पर्यायी ओपीडी सुरू करून रुग्णांवर उपचार केले.
जवळपास ६५० रुग्णांची तपासणी करून औषधोपचार देण्यात आले. निवासी डॉक्टरांच्या संपामुळे लातुरातील वैद्यकीय सेवा पूर्ण विस्कळीत झाली आहे. रुग्णालयाचे ८० टक्के काम निवासी डॉक्टरच पाहतात.
बाहेरून येणाऱ्या रुग्णांचे हाल लक्षात घेता समांतर बाह्य़रुग्णांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मार्डचे जिल्हाध्यक्ष डॉ. आकाश येंडे व डॉ. बाबासाहेब चव्हाण यांनी दिली.
या कामी शासकीय रुग्णालयाची कोणतीही मदत न घेता खासगी स्वयंसेवी संस्था व औषध कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या सहकार्याने रुग्णांना औषध, गोळ्यांची सोय करण्यात आली आहे.
दरम्यान, एमबीबीएसच्या तृतीय वर्षांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘तुला परीक्षेत नापास करतो, परीक्षेला बसू देणार नाही’, अशा धमक्या देऊन अधिकारी दबाव आणत असल्याची तक्रार मार्ड संघटनेने केली आहे.