जागतिक कीर्तीचे भारतीय गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त शिवाजी विज्ञान महाविद्यालयातर्फे २८ ते ३१ डिसेंबर दरम्यान ‘गणितीय विज्ञान’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत जगभरातील ५० आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ आणि ४०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डी. के. बुरघाटे यांनी पत्रकारांना दिली.
शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अबंत इझेत बायलस विद्यापीठ, बोलुतुर्की आणि गायकवाड पाटील ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आली आहे. परिषदेचे उद्घाटन २८ डिसेंबरला सकाळी ९.३० वाजता जिंदल अवार्ड विजेते आणि आधुनिक संगणकाचे जनक पदमश्री डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड अरुणकुमार शेळके, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ उपस्थित राहणार आहेत. तीन दिवस होणाऱ्या परिषदेत गणितीय विज्ञानासंबंधी विविध विषयावर तज्ज्ञाची भाषणे होणार आहे. या विषयावरील संशोधन पेपर्स परिषदेत वाचून दाखविण्यात येणार आहेत. गणितीय विज्ञानावरील ही मध्य भारतातील एकमेव आंतरराष्ट्रीय परिषद आहे ज्यात गणितीय विज्ञानावरील मुख्य भाग समाविष्ट करण्यात आला आहे. १९९९ मध्ये नागपूर विद्यापीठाने पहिली परिषद आयोजित केली होती. विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षकांना गणितातील धागेदोरे संधी आणि गणितविषयासंबंधी अधिक माहिती देणे हा परिषदेचा मुख्य उद्देश आहे. या परिषदेत गणिताच्या मुळापासून तर आधुनिक संशोधनापर्यत चर्चा होणार असून त्याचा फायदा पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना होणार आहे. जगविख्यात शास्त्रज्ञांशी विद्यार्थ्यांना या परिषदेच्या निमित्ताने संवाद साधता येणार आहे. जनमानसात गणित विषयाबाबत जिज्ञासा निर्माण करणे हा परिषदेचा एकमेव उद्देश असल्याचे बुरघाटे म्हणाले, पत्रकार परिषदेला डॉ. जी.आर. अवचार, मोहन गायकवाड उपस्थित होते.