मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील वाघोडा-रावेर स्थानकादरम्यान असलेल्या रेल्वे पुलाचे बांधकाम करण्यात येणार असल्याने ३० एप्रिल तसेच ४, ६ व ८ मे रोजी ‘मेगा ब्लॉक’ करण्यात येणार आहे. यामुळे प्रवासी वाहतूक विस्कळीत राहणार असून काही रेल्वेगाडय़ा आपल्या नियमित वेळेपेक्षा विलंबाने धावणार आहेत.
रेल्वे सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी पहिला ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात आल्यानंतर ३० एप्रिल रोजी सकाळी साडे आठ ते दुपारी १२.१० दरम्यान ‘अप’ मार्गावर वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे १२९४६ छपरा-सूरत ताप्तीगंगा एक्स्प्रेस तसेच १२३३५ भागलपूर लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस या दोन्ही गाडय़ा वाघोडा रेल्वे स्थानकावर ४० मिनिटे थांबविण्यात येणार आहे.
१२५३३ लखनऊ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई  पुष्पक एक्स्प्रेस बऱ्हाणपूर रेल्वे स्थानकावर ४० मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे.
४ मे रोजी सकाळी ७.४० ते १०.५० दरम्यान अप मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे वाघोडा रेल्वे स्थानकावर १२९४६ छपरा-सूरत ताप्तीगंगा एक्स्प्रेस व १२३३५ भागलपूर लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस या गाडय़ा अनुक्रमे १० व २० मिनिटांसाठी थांबविण्यात येतील.  १२५३३ लखनऊ-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस ही गाडी बऱ्हाणपूर स्थानकावर १५ मिनिटांसाठी थांबविण्यात येईल.
६ मे रोजी सकाळी ७.४० ते ९.४० या कालावधीत काम करावयाचे असल्याने १५०१८ गोरखपूर लोकमान्य टिळक टर्मिनस ही एक्स्प्रेस ही गाडी वाघोडा रेल्वे स्थानकावर २० मिनिटे थांबवून ठेवण्यात येईल. ७ मे रोजी सकाळी ७.४० ते ११.२० दरम्यान काम करावयाचे असल्याने १२९४६ छपरा सूरत ताप्ती एक्स्प्रेस व १२३३५ भागलपूर लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस या गाडय़ा वाघोडा रेल्वे स्थानकावर ४० मिनिटांपर्यंत थांबविल्या जातील. तसेच १२५३३ लखनऊ-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस पुष्पक एक्स्प्रेस बऱ्हाणपूर रेल्वे स्थानकात ४० मिनिटे थांबविण्यात येणार आहे.
८ मे रोजी सकाळी ९.४० ते ११ वाजेदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार असल्याने १२९४६ छपरा सूरत ताप्तीगंगा एक्स्प्रेस वाघोडा रेल्वे स्थानकावर २५ मिनिटे थांबविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.