ऐन निवडणुकीच्या प्रचारात घडलेल्या शेगाव खूनखटल्यातून काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासह सर्व २९ आरोपींची मुक्ततेच्या निकालाने संपूर्ण जिल्हा आज ढवळून निघाला. या निकालाने चार वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचे पुन्हा एकदा स्मरण झाले.
या खटल्यात तब्बल २९ आरोपींविरुद्ध न्यायालयात दोनशे पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. तर यामध्ये आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्यासह २८ साक्षीदार तपासले गेले.
भाजपचे आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे सिद्धाराम म्हेत्रे व त्यांचे वडील सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्याशी अनेक वर्षांपासून वैर आहे. यापूर्वी विधानसभा निवडणुकीत तीन वेळा निवडून आलेले म्हेत्रे यांच्याकडून आमदार पाटील यांना हार पत्करावी लागली होती. मागील २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत हे दोघे पुन्हा एकमेकांविरुद्ध उभे होते. त्या वेळी पाटील यांनी निवडून येण्यासाठी जोर लावला होता, तर तत्कालीन गृहराज्यमंत्री म्हेत्रे यांनीही आपले वर्चस्व टिकविण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण सोलापूर जिल्हय़ासह बाजूच्या कर्नाटक सीमा भागाचेही लक्ष वेधले होते.
या निवडणुकीच्या प्रचारासाठी सिद्रामप्पा पाटील हे शेगाव येथे आले असताना अचानकपणे शंकर म्हेत्रे यांच्यासह २८ आरोपींनी, ‘आमच्या गावात का आलात, म्हेत्रेसाहेबांचा विरोध करण्यासाठी येथे येता का, येथून निघून जा, म्हेत्रेसाहेब की जय’ असे म्हणून सिद्रामप्पा पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांवर लोखंडी सळई, तलवारी, हंटर व दगडांनी हल्ला चढवला. म्हेत्रे समर्थक बाबुराव पाटील याने टोकदार लोखंडी सळईने भाजपचे कार्यकर्ते भीमाशंकर कोरे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यात ते गंभीर जखमी होऊन मरण पावले. तर आमदार पाटील यांच्यासह श्रीमंत कोरे (५८), कल्लप्पा गड्डी (६५), संगप्पा गड्डी (२२), महादेव कोरे (४०) आदी दहा कार्यकर्ते जखमी झाले. या घटनेच्या आठ दिवस अगोदर स्वत: सिद्धाराम म्हेत्रे व त्यांचे बंधू शंकर म्हेत्रे यांनी शेगाव येथे येऊन बाबुराव पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्या वेळी सिद्धाराम म्हेत्रे यांनी, तुम्हाला कोणी काय बोलले तर तुम्ही मला सांगा, पाच मिनिटांत मी माझी माणसे पाठवून देतो, तुम्ही कोणालाही मारा, काहीही करा, अशी चिथावणी दिली होती. याबाबतची फिर्याद मृत भीमाशंकर कोरे व त्यांचे जखमी बंधू श्रीमंत कोरे यांनी पोलिसात नोंदवली होती. त्यानंतर प्रत्यक्ष म्हेत्रे गटाकडून सशस्त्र हल्ला झाला. या घटनेमुळे सोलापूर जिल्हय़ासह पश्चिम महाराष्ट्र व सीमा भागात खळबळ माजली होती.
या गुन्हय़ाचा तपास सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखा व राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने केला होता. मात्र राजकीय दबावामुळे पोलीस तपास निष्पक्ष पोलीस तपास होत नसल्यामुळे त्याविरोधात अक्कलकोट येथे भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मोर्चा काढला होता. दरम्यान, सिद्धाराम म्हेत्रे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळाला. तपासानंतर म्हेत्रे बंधूंसह सर्व २९ आरोपींविरुद्ध न्यायालयात दोनशे पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. या खटल्यात सरकारतर्फे विशेष सरकारी वकील धैर्यशील पाटील (सातारा) यांनी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्यासह २८ साक्षीदार तपासले. तर मूळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड. मिलिंद थोबडे व अ‍ॅड. राजकुमार मात्रे यांनी काम पाहिले. आरोपींतर्फे अ‍ॅड. जी. जी. दोडमनी (गुलबर्गा), अ‍ॅड. हर्षद निंबाळकर (पुणे), अ‍ॅड. व्ही. डी. फताटे व अ‍ॅड. विक्रांत फताटे यानी बचाव केला. मृत भीमाशंकर म्हेत्रे यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याचे म्हणणे सुरुवातीला मांडण्यात आले होते. गुन्हय़ात वापरलेली बंदूक आरोपी गुरुनाथ पाटील याने काढूनही दिली होती. परंतु नंतर गोळीबार नव्हेतर लोखंडी सळईने त्यांचा खून करण्यात आल्याची साक्ष नोंदविण्यात आली होती. त्याबाबतचे प्रतिज्ञापत्रही सादर झाले होते. परंतु साक्षीदारांची साक्ष विसंगत व अविश्वासार्ह असल्याचा आरोपींच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने मान्य करून खुनाच्या आरोपातून म्हेत्रे बंधूंसह सर्व आरोपींना निर्दोष सोडले. परंतु म्हेत्रे बंधू वगळता आरोपींपैकी दहा जणांना हल्ला करून जखमी केल्याबद्दल दोषी धरण्यात आले. यात मल्लिकार्जुन अप्पाराव अण्णाराव पाटील यास चार वर्षे सक्तमजुरी व दोन हजार दंड सुनावण्यात आला. तर तम्माराव बसप्पा पाटील, गुरुनाथ पाटील, हणमंत बाबुराव पाटील आदी दहा आरोपींना प्रत्येकी तीन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.