नवी मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी पालिकेने सादर केलेल्या मतदार यादीत बराच गोंधळ असून ९४६ तक्रारी दाखल झालेल्या आहेत. यात नावापुढे पत्ते नसणे, नावातील लिंगबदल, छायाचित्र गायब आणि मतदान दुसऱ्या प्रभागात आणि राहण्यास तिसऱ्या प्रभागात अशा तक्रारींचे स्वरूप आहे. हा कितीही गोंधळ असला तरी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने आता आहे त्या स्थितीत निवडणुका पार पडणार असल्याचे समजते.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशावरून नवी मुंबई पालिकेने १७ मार्च रोजी प्रभाग रचना जाहीर केली आहे. त्याच्या याद्या आता उमेदवारांच्या हातात पडत आहेत. त्यामुळे मतदार यादीत तयार झालेले गोंधळ समोर येत आहेत. त्यामुळे बेलापूर- ६६, नेरुळ-२३३, वाशी- ८४, तुर्भे- २४०, कोपरखैरणे- ११७, घणसोली- १६६, ऐरोली- ३९ आणि दिघा- ०१ अशा ९४६ तक्रारी आहेत. यात तुर्भे व नेरुळमध्ये जास्त तक्रारी असून या केवळ इच्छुक उमेदवारांच्या तक्रारी आहेत. ऐरोली प्रभाग २१ मधील भाग १८ ला जोडण्यात आला आहे. या दोन प्रभागांत भौगोलिक अंतर खूप आहे, पण प्रभागाची रचना अशी चित्रविचित्र करण्यात आली आहे. त्याला आक्षेप घेऊन थातुरमातुर सुनावण्या घेतल्या जातील, पण त्यातील गोंधळ कायम राहणार आहे. याचा फटका अनेक उमेदवारांना बसणार आहे. पालिका कर्मचाऱ्यांनी रात्रदिवस एक करून या मतदार याद्या सहा दिवसांत तयार केल्या आहेत. त्यामुळे त्यात काही दोष राहण्याची शक्यता पालिका प्रशासनाच्या वतीने मान्य केली जात आहे, पण त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत केला जाईल, असेही सांगितले जात आहे. मतदारांच्या अदलाबदलीमुळे मात्र काही उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत या उमेदवारांमध्ये संभ्रम कायम राहणार आहे.